आम्ही सिद्ध लेखिका समूहाचे काव्यमंथन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ; भुसावळसह जळगाव, यावल, भडगाव, अमळनेर अशा विविध ठिकाणच्या आम्ही सिद्ध लेखिका समूहाच्या वीसपेक्षा जास्त कवयित्रींनी एकाहून एक सरस कविता सादर करीत काव्यमंथन केले. हे काव्यमंथन अमळनेर येथील साई गजानन हॉलमध्ये प्रा.संध्या महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

सौ.रेखा वाल्मिक मराठे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आयोजित या संमेलनाला प्रमुख अतिथी कमलताई पाटील, नगरसेविका गायत्री पाटील, कवयित्री सौ.जयश्री काळवीट, ज्येष्ठ कवयित्री श्रीमती ललिता टोके, खान्देश साहित्य संघाचे प्रमुख डॉ.कुणाल पवार उपस्थित होते.

ईशस्तवन व स्वागत गीताने सुरूवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सौ.रेखा मराठे यांची कन्या यशश्री हिने राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल प्रा.संध्या महाजन यांनी तिचा लेवा गणबोली साहित्य संमेलनाचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. आम्ही सिद्ध लेखिका समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या कथा स्पर्धेचे खान्देश विभागाचे परीक्षण केल्याबद्दल कवयित्री सौ.जयश्री काळवीट यांचा समूहाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन प्रा. संध्या महाजन यांनी गौरव केला. ज्येष्ठ कवयित्री ललिता टोके यांनी बहिणाईच्या लेकी

या नितांत सुंदर कवितेने काव्यसादरीकरणाची सुरूवात केली. त्यानंतर कवयित्री जयश्री काळवीट यांनी मुली, रजनी पाटील यांनी जाऊ दे माय जत्राले, सौ.छाया पाटील यांनी अष्टभुजा नारायणी, सौ.संगीता महाजन यांनी स्त्री मन जपताना, सौ.रेखा मराठे, शेख जबिन यांनी स्त्रीपुरुष, मनिषा पाटील यांनी सासू सुनेचे नाते, प्रतिभा पाटील यांनी वीरमाता, अनिता पाटील यांनी स्वातंत्र्याची कथा, कवयित्री संध्या भोळे यांनी उंच माझा झोका, वंदना भिरूड यांनी कचऱ्याचा डबा, कवयित्री मंगल नागरे यांनी बायांनी, रूपाली मोरे यांनी विश्वशांती कविता सादर केली. पल्लवी बागुल, रूपाली पाटील, नूतन पाटील, तिलोतमा पाटील, पद्मजा पाटील आदी स्थानिक कवयित्रींनीही आपल्या बहारदार रचना सादर केल्या. डॉ. कुणाल पवार यांनी बाप कविता सादर केली.

कमलताई पाटील यांनी एक संग्रहित कविता सादर केली व सर्वच कवयित्रींचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतात प्रा.संध्या महाजन यांनी कवितेच्या उत्पत्तीचा इतिहास मांडून बहिणाबाईंची महती सांगणारी गेय कविता सादर केली. सूत्रसंचालन मुख्याध्यापक अनिता बोरसे यांनी तर आभार प्रतिभा पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी सौ.रेखा मराठे, वाल्मिक मराठे, डॉ.कुणाल पवार, दत्ता सोनवणे, नेरकर सर, सौ.श्रद्धा पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.