बीएचआरचे चार बँक खाते सील; पीएफ आयुक्तांचे जप्तीचे आदेश

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्था म्हणजेच बीएचआरचे बँक खाते सील करण्यात आले आहे. कर्मचार्‍यांचा तब्बल ६ कोटी ५० लाख रूपयांचा भविष्य निर्वाह निधी थकीत असल्यामुळे बीएचआर पतसंस्थेचे चार बँक खाते सील करण्याचे आदेश पीएफच्या विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

नाशिकच्या भविष्यनिर्वाह निधी आयुक्तांनी जप्तीचे आदेश दिले आहेत. कारण बीएचआरने कर्मचार्‍यांना पीएफचे ६ कोटी ५० लाख रुपये दिले नाहीत. तसेच बीएचआर पतसंस्थेत कार्यरत असलेल्या दोन हजार कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या १३ कोटी रुपयांची थकबाकी असून याबाबत पीएफ कमिशनर यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. याबाबत कार्यवाहीचे आदेश देतांना आयुक्तांनी बीएचआरचे चार बँक खाते सील करण्याचे देखील निर्देश दिले आहेत.

बीएचआर पतसंस्थेत झालेला गैरव्यवहार प्रचंड चर्चेत होता. दरम्यान अवसायकांकडून बीएचआरची कर्जवसुली करून ठेवीदारांना परत करण्याची कार्यवाही सुरू आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी वसूल झालेली रक्कम जप्त झाल्यावर विलंब लागणार आहे. कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे पैसे बीएचआर या पतसंस्थेने वेळोवेळी भरलेले नाहीत. त्यामुळे या पतसंस्थेच्या जप्तीचे आदेश निघाले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बीएचआरतर्फे रिट पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे. यावर आज सुनावणी होणार असल्याची माहिती अवसायक चैतन्यकुमार नासरे यांनी दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.