भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे भगतसिंह कोश्यारींचा (Bhagat Singh Koshyari) राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. नेहमीच वादग्रस्त विधान करून टीकेचे धनी होणारे भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढले होते आणि ते यांना चांगलंच भोवलं आहे. या विधानावरून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याकडे सोपवण्यात आला होता. कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याने विरोधकांच्या मागणीला यश आलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले (Mahatma Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. महाविकास आघाडीने तर राज्यपालांच्या विरोधात मोठा मोर्चाही काढला होता. तसेच राज्यात ठिकठिकाणी राज्यपालांचे पुतळे जाळून आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.