उत्तुंग यशासाठी स्वप्नांना प्रयत्नांची जोड द्या – महेश कौंडिण्य

0

पाचोरा ,लोकशाही न्युज नेटवर्क

जर आयुष्यात उत्तुंग यश गाठायचे असेल तर उदात्त स्वप्नांना तितक्याच कठोर परिश्रमांची जोड देणे आवश्यक असल्याचे मत येथून जवळच असलेल्या वाडी शेवाळे येथील शांतीलाल नथमल जैन (धोका) माध्यमिक विद्यालयात नुकत्याच  झालेल्या एस. एस. सी. च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले महेश कौंडिण्य यांनी व्यक्त केले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एस. डी. पाटील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महेश कौंडिण्य उपस्थित होते.दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी केवळ गुणात्मक स्पर्धा करण्याऐवजी स्वतःतील क्षमता ओळखून भविष्यातील यशाच्या वाटा निवडाव्यात आणि परीक्षेचे दडपण घेण्याऐवजी शांत मनाने एकाग्र होऊन परीक्षेला सामोरे गेल्यास निश्चितच यश मिळेल आणि वेगवेगळे उदाहरण देत जिद्द, त्याग आणि कठोर परिश्रम हीच यशाची त्रिसूत्री असल्याचे महेश कौंडिण्य यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानावरून बोलतांना एस.डी. पाटील यांनी एक चांगला नागरिक बनण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा आणि आदर्श समाज अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविकात मुख्याध्यापक प्रताप सूर्यवंशी यांनी गेल्या काही वर्षात शाळेने राबवलेल्या विद्यार्थी हिताच्या विविध योजनांची आणि उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी सदिच्छा दिल्या.

यावेळी दहावीला असणाऱ्या श्वेता शिंदे, केतन पाटील, श्रद्धा खामट, प्राजक्ता पाटील, प्रणाली शिंदे, नंदिनी पाटील या विद्यार्थ्यांनी देखील शाळेच्या आठवणी सांगत शाळेबद्दल ऋण व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य संजय खमाट, गणेश पाटील, ईश्वर पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन रमेश पाटील डॉ. शेखर पाटील, महेश पाटील यांचे सह पालक आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता टोणपे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रताप सूर्यवंशी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.