लाकुड तस्करांचा धुमाकूळ; अवैध वृक्षतोडीकडे वन अधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जळगाव जिल्ह्यासह भडगाव तालुक्यातील विरप्पनच्या पिल्लावळीने तसेच लाकुड व्यवसायातील दलालांनी धुमाकूळ घातला असून स्वयंचलित यंत्राच्या साह्याने दररोज शेकडो नव्हे तर हजारो हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल करून ट्रॅक्टर द्वारे लाकडाची वाहतूक केली जात आहे.

ही होणारी अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी मा. तहसीलदार तसेच संबंधित तालुक्यातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे भ्रमणध्वनीवर तर कधी प्रत्यक्ष भेटून लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र संबंधित वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आजपर्यंत कुठलीही ठोस कारवाई केली नसल्याने वनविभागाचे अधिकारी व तसेच लाकुड व्यापारी यांच्यात अर्थपूर्ण मैत्रीचे घट्ट असे नातेसंबंध झाल्याचा आरोप निसर्गप्रेमी व सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे.

याबाबत एका सुज्ञ नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की, लाकुड व्यापारी, यांच्यातील दलाल यांची साखळी निर्माण झाली असून वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झिरो तसेच लाकुड व्यापाऱ्यांचे दलालांच्या मार्फत महिन्याकाठी ठराविक रक्कम घेऊन थोडक्यात सांगायचे झाले तर (हप्ते) घेऊन या अवैध वृक्षतोडीला मुक संमती दिली असल्याने ही अवैध वृक्षतोड दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरु असल्याचे सांगत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनीचे कॉल डिटेल्स काढले तर लगेच दुध का दुध व पाणी का पाणी होईल असे ठामपणे सांगितले.

एका बाजूला नवनविन मोठ-मोठे प्रकल्प, कारखाने, रस्तांचे विस्तारीकरण, दररोज हजारो एकर शेत जमीनीचे बिगर शेतीत होणारे रुपांतर व त्या जागेवर उभी राहणारी सिमेंटची जंगलं, कोटींच्या संखेने रस्त्यावर धावणाऱ्या स्वयंचलित वाहनातून सोडला जाणिरा कार्बनडाय ऑक्साइड तर दुसरीकडे भडगाव तालुक्यातील राखीव जंगलासह खाजगी शेत शिवारातील निसर्ग संपत्तीचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. तर वाहनातून निघणारा कार्बन डायऑक्साइड तर दुसरीकडे भडगाव तालुक्यातील राखीव जंगलासह खाजगी शेत शिवारातील निसर्ग संपत्तीचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. काही नविन वखारी भडगाव शहरात स्थलांतरित करुन लाकुड वखार व आरी मशीनचा व्यवसाय जोमाने सुरु करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. अशीच अवैध वृक्षतोड सुरु राहिल्यास भविष्यात मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त करत अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी जनचळवळ उभारली गेली पाहिजे व अवैध वृक्षतोड करणाऱ्या व्यापाऱ्यांसह संबंधित शेत मालक, वनविभागाचे अधिकारी  विभागाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.