संत साहित्यातून झाली मराठी भाषेची समृद्धी

0

लोकशाही विशेष लेख

माझा मराठीची बोलू कौतुके |
परि अमृतातेही पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

अमृतापेक्षाही माझी मराठी भाषा गोड आणि मधूर आहे. अशा सुंदर शब्दात संत ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेचे वर्णन केले आहे. मराठी भाषेमध्ये गोडवा आहे, प्रेमाचा ओलावा आहे, संस्कारांची पेरणी आहे, सहजता, सुंदरता आहे आणि सर्वांना जवळ करण्याची ताकद आहे.

मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली हे सांगणे कठीण आहे. अभ्यासकांच्या मते मराठी भाषेची निर्मिती संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, मराठी अशी झाली. इ.स.चौथ्या-पाचव्या शतकात महाराष्ट्राची भाषा ‘महाराष्ट्री’ला म्हणजे अपभ्रंश महाराष्ट्रीचा जन्म झाला असे मानले जाते.या अपभ्रंश महाराष्ट्रीपासून नवव्या-दहाव्या शतकात मराठी भाषेचा जन्म झाला आणि तेव्हा पासून मराठी भाषा शिलालेख, ताम्रपट, आरंभीच्या ग्रंथांमध्ये लिखित स्वरुपात दिसते.

शके ११०९ मधील मुकुंदराजाचा ‘विवेकसिंधु’ हा ग्रंथ मराठी भाषेतील आद्यग्रंथ मानला जातो. परंतु मराठी भाषेच्या खर्‍या क्रांतीला सुरुवात झाली ती संत ज्ञानेश्वरांच्या शके १२१२ मधील ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथामुळे. ज्ञानेश्वरी सारखा महान, श्रेष्ठ, मोठा ग्रंथ त्या आधी मराठी भाषेत लिहिला गेला असेल याचे कुठलेही पुरावे सापडत नाही.संस्कृत भाषेत असलेल्या श्रीमद्भगवद्गीतेवर टिका करून गीतेतील ज्ञान मराठी भाषेत आणून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी खुले केले. म्हणूनच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला असून आजही या ग्रंथाचे पारायण घरोघरी केले जाते.

संत ज्ञानेश्वर (Saint Dnyaneshwar), संत नामदेव (Saint Namdev), संत मुक्ताबाई (Saint Muktabai), संत जनाबाई (Saint Janabai), संत गोरा कुंभार , संत चोखामेळा, संत नरसी सोनार, संत कान्होपात्रा, संत सावता माळी, संत एकनाथ, संत तुकाराम या समाजातील विविध संतांनी समाजाच्या उद्धाराच्या कार्यासोबत ज्ञानाचा, तत्वज्ञानाचा, सत्याचा प्रसार करून मराठी भाषेलाही समृद्ध आणि श्रीमंत केले.

जैसी दीपांमाझि दिवटी ।
कां तिथींमाझि पूर्णिमा गोमटी ।
तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी सर्वोत्तम ॥
संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा केलेला गौरव, मराठीप्रती असलेला शुद्ध भाव सर्व संताच्या ठायी होता. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांचे शिष्य निळोबारायांपर्यंत सर्व संतांनी अभंग रचून हा काव्यप्रकार घरोघरी पोहोचवला. शिखांच्या ‘गुरुग्रंथसाहेब’ या ग्रंथात संत नामदेवांची ६१ पदे आहेत.संत नामदेवांनी आपला मराठीचा झेंडा थेट पंजाबपर्यंत रोवला.

संत एकनाथांनी ‘माझी मराठी भाषा चोखडी । परब्रह्मे फळती गाढी’असे म्हणत काशीमध्ये मराठीचा जयजयकार केला. त्यांनी मूळ संस्कृत भाषेत असणाऱ्या रामायणावर आधारित ‘भावार्थ रामायण ‘ हा ग्रंथ लिहिला. मराठी भाषेतील हे पहिले रामायण आहे. त्यानंतर एकनाथी भावार्थ रामायणावर आधारित विपुल साहित्याची निर्मिती मराठी साहित्यात झाली. उदा. ग दि. माडगूळकरांचे अजरामर झालेले गीतरामायण.

संत एकनाथांनी आपल्या लोककलांना आणि लोकभाषेला प्राधान्य देऊन साहित्याची रचना केली. लोककलेला समृद्ध करणारा भारूड हा काव्य प्रकार त्यांनी रुढ केला. भारुडातून त्यांनी समाजाचे प्रबोधन केले तर गौळण या प्रकारातून त्यांनी फक्त कृष्ण भक्ती मांडली नाही तर श्रृंगार रस देखील मांडला.आज गौळणी लावणी, वग हे जे साहित्य आहे त्याची मूळे संत एकनाथांच्या भारुडे आणि गौळणीत आहे.

आजही खेड्यापाड्यात संत जनाबाईच्या जात्यावरील ओव्या, असंख्य महिला गातांना दिसतात. त्यानंतर १९ व्या – २० व्या शतकात बहिणाबाई चौधरींनी जात्यावरील ओव्या काव्यप्रकारात भर टाकली. मराठी साहित्याचा मोठा भाग संत साहित्य आणि दलित साहित्याने व्यापला आहे. संत चोखामेळ्यांकडे पहिले दलित कवी म्हणून बघितले जाते. दलित साहित्याची मूळे संत साहित्यात आपल्याला सापडतात.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मराठी भाषेच्या वैभवात भर टाकली. प्र. के. अत्रे तर म्हटले होते की, ज्याला तुकोबांचा एखादा तरी अभंग तोंडपाठ येतो, तोच खरा मराठी माणूस. महात्मा ज्योतिबा फुले यांनी संत तुकारामांच्या अभंगाच्या धर्तीवर ‘अखंड’ ही काव्यरचना निर्माण केली. महात्मा फूलेंची अखंड रचना अभंगाचे आधुनिक रुप आहे. दलित,गरीब,शोषितांच्या व्यथा, वेदना मांडण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ मूकनायक ‘ या पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी काढला. शीर्षकाखाली संत तुकारामांच्या अभंगाच्या ओळी वापरल्या होत्या. त्या अशा की,

काय करूं आतां धरूनिया भीड
निःशंक हें तोंड वाजविले
नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण
सार्थक लाजून नव्हे हित”.

यानंतर ‘बहिष्कृत भारत’ या नियतकालिकासाठी बिरुदावली म्हणून संत ज्ञानेश्वरांच्या ओळी वापरलेल्या दिसून येतात.यावरुन संतांच्या मराठी भाषेची ताकद आपल्या लक्षात येते. या सर्व संतांमुळेच मराठी भाषेचा प्रवाह वाहत गेला आणि अधिकाधिक समृद्ध झाला.मराठी साहित्य प्रकारांना संत साहित्याचा परिसस्पर्श लाभला आहे,हे प्रकर्षाने जाणवते. आधुनिक कविता, गीत, पोवाडे, भारुडे, नाटके यांवर संत साहित्याचा प्रभाव दिसून येतो.कवींनी ज्यावेळेस मराठी भाषेविषयी कविता तयार केली, तेव्हा त्यामध्ये या संतांचा उल्लेख आढळतो.

कुसुमाग्रज ‘मराठीपण’ या कवितेत म्हणतात,
“माझं मराठीपण मी शोधलं
सह्याद्रीच्या डोंगरात
संतांच्या शब्दात”

माधव ज्युलियन ‘आमुची मायबोली’ या कवितेत म्हणतात,
‘मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी’

वि. म. कुलकर्णी ‘मराठीची गोडी’ या कवितेत म्हणतात,
“ज्ञानोबांची – तुकयाची
मुक्तेशाची – जनाईची
माझी मराठी चोखडी
रामदास – शिवाजीची”

मधुकर केचे ‘माय मराठी’ कवितेत म्हणतात,
“कधी चेटूक मराठी उभी चंद्रभागे काठी ।
कसा बाई हिच्यासंगे वेडा झाला जगजेठी ॥
हिने जागविला तुका, हिने गाजविला चोखा ।
वेद वेडा करूनिया रेडा बोलविला मुका ।।”

अशोक नायगावकर ‘मराठीचा पाठ’ या कवितेत म्हणतात,
“ज्ञानराज स्फुंदे । समाधी आतून । परभाषा मोळी । गळा आली ॥
बऱ्या बोलाने गा । बोला मराठीत । तुक्याचे हाती । सोटा आहे ॥”

यावरून आपल्याला जाणवते की मराठी साहित्यावर निश्चितच संतसाहित्याचा प्रभाव आहे.संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेविषयी अभिमान बाळगला पाहिजे.मराठी रोजच्या वापरात कशी येईल, ती आपली ओळख कशी बनेल याचा विचार केला पाहिजे आणि प्रत्यक्षात तशा स्वरुपाची कृती केली पाहिजे.

वर्षा रविंद्र उपाध्ये
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.