कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत ; मुख्यमंत्री पदासाठी चार नावे चर्चेत

0

बंगळुरू , लोकशाही न्यूज नेटवर्क

कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस १२८, जेडीएस २२ तर भाजपा ६७ जागांवर आघाडीवर आहे.
तर इतर ४ जण आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसला चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे.

काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. फटाके ढोल वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि नेते सिद्धारमय्या यांना हायकमांडने आजच दिल्लीला बोलावल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण याचा फैसला उद्याच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. पण त्याच सोबत आता काँग्रेसचे जेष्ठ नेते परमेश्वर आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नावही पुढे येत आहे. काँग्रेसचे सर्वात मोठे नेते सिद्धरामय्या हे पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सिद्धरामय्या यांनी २०१३ ते २०१८पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.

डीके शिवकुमार यांनी काल म्हणजेच १२ मे रोजी एक ट्वीट केलं होतं ज्यामधून त्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी सांगितल्याचे संकेत मिळत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी डीके शिवकुमार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या तीन वर्षांच्या मेहनतीचा ट्रेलरचा व्हिडीओ शेअर करुन मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. डीके शिवकुमार हे कनकापुरा मतदारसंघातून सलग ८ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.