लोकशाही न्यूज नेटवर्क
फॅशनेबल बांगड्या घातल्याने एका विवाहितेला तिच्या पती व सासूने तसेच एका महिला नातेवाईकाने मारहाण केल्याची घटना दिघा येथे उघडकीस आली आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या घटनेतील पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पती, सासू व एका महिला नातेवाइकाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
या घटनेतील २३ वर्षीय पीडिता, पती प्रदीप अरकडे व सासू यांच्यासह दिघा येथे राहण्यास असून गत १३ नोव्हेंबर रोजी पीडितेने फॅशनेबल बांगड्या घातल्या होत्या. यावेळी पती हा फॅशनेबल बांगड्या घालण्याच्या विरोधात असल्याने त्याने पत्नीसोबत वाद घालत भांडण काढले. यावेळी पीडितेला ५० वर्षीय सासूने तिचे केस ओढून तिला मारहाण केली. एवढेच नाही तर पटीने तिला पट्याने मारहाण केली. यावेळी एका महिला नातेवाईकाने देखील तिला मारहाण केली. या प्रकरणानंतर पीडित तरुणीने पुण्यातील आपले महेर गाठून तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी पीडित विवाहितेचा पती, सासू व महिला नातेवाईक या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून प्रकरण पुढील चौकशीसाठी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडून वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.