बळीराम पेठेत विजेच्या कमी अधिक भाराने इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शहरातील बळीराम पेठ परिसरात गेल्या कित्येक महिन्यांपासून विजेचा भार कधी कमी तर कधी जास्त अशा प्रकारे प्रवाहित होत आहे. या विजेच्या कमी अधिकभारामुळे बळीराम पेठ परिसरातील अनेक नागरिक त्रस्त झाले असून कित्येक नागरिकांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी देखील होत असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. बऱ्याच दिवसांपासून व्होल्टेज फ्रक्चुएशनमुळे विविध विजेची उपकरणे जळत आहेत.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून त्यांच्या महागड्या तसेच दैनंदिन वापरातील महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू कायमच्या निकामी होतं आहे. टीव्ही, फ्रीज, पंखे, ए.सी. यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये विजेच्या कमी जास्त होणाऱ्या भारामुळे बिघाड होत आहे.

जळगाव महावितरणकडे याबाबत अनेकवेळा तक्रारी करून देखील यावर आजवर तोडगा न काढल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आधीच विजेची समस्या निर्माण झालेली असताना त्यात भरीसभर म्हणून विजेचा भार कमी अधिक होण्याची जुनी समस्या नव्याने तोंड वर काढत आहे.

बळीराम पेठेमध्ये ही समस्या इतर प्रभागांपेक्षा जास्त असल्यामुळे नागरिकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. एम.एस.ई.बी. ने या समस्येकडे जातीने लक्ष द्यावे, तसेच यावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.