मतदार संघातच बच्चु कडूंना पराभवाचा धक्का…

0

 

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शिंदे गटासोबत गेलेले आमदार बच्चू कडू यांना चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. १५ संचालकांकरीता १९ मार्च रोजी झालेल्या मतदानानंतर सोमवारी मतमोजणी झाली. सहकार व शेतकरी पॅनलच्या चुरशीच्या लढतीत बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे १२ संचालक तर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या शेतकरी पॅनलचे तीन संचालक विजयी झाले. काँग्रेस आणि प्रहारने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या गृह तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत प्रहारचे अवघे तीन उमेदवार निवडून आले. यावेळी जल्लोष करताना विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी ‘५० खोके एकदम ओके’ अशी नारे बाजी केली. सुरुवातीपासूनच अटीतटीच्या लढतीत अखेर तालुका खविसवर बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, प्रमोद कोरडे, यांचे सहकार पॅनलने प्रहारचा धुव्वा उडवून सहकार पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

या निवडणुकीत विविध मतदान केंद्रावर प्रहार व सहकार पॅनलच्या उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, तळवेल केंद्रावर बबलू देशमुखच्या गटाला १० टक्के मते प्राप्त झाल्याने हा विजय सुकर झाला. बहुतांश ठिकाणी सहकार व शेतकरी पॅनलमध्ये जयपराजयासाठी एका मताचा फरक होता. सहकार पॅनेलचे प्रताप किटुकले (२८), श्रीपाद आसरकर (२७), राजेंद्र खापरे (२७), कुलदीप सोनार (२७). शेतकरी पॅनलचे अनंत काळे (२७), प्रभाकर किटुकले (२७), साहेबराव पोहोकार (२७) यांचा समावेश आहे.

या ठिकाणी एकही मत बाद झाले नाही. तसेच वैयक्तिक भागधारक मतदार संघात सहकार पॅनलचे आठही उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये वैयक्तिकचे, सतीश गणोरकर (२१४१) मते, संजय गुजर (२०३०), रावसाहेब लंगोटे ( २१११), महिला टेबलवर राखीव मध्ये सुनिताबाई काळे (२१५४), अनिता देशमुख (२१७०), विमुक्त जाती जमाती मध्ये विलास शेकार (२२२२), अनुसूचित जाती जमाती मध्ये श्रीकृष्ण वानखडे (२१५५), तर इमावमध्ये शिवाजी बंड (२२३८) यांचा समावेश आहे.

वैयक्तिक मध्ये एकूण ५५८ मते बाद झालीत. सदर मतमोजणी एकूण ७ करण्यात आली. निवडणूकीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, आर. व्ही. भुयार सहायक निबंधक मोर्शी यांनी जाहीर केला. त्यांना मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात अविनाश महल्ले सहायक निबंधक, दिपक चांभारे सहायक निबंधक, उदय शिवणकर सहायक निबंधक यांनी सहकार्य केले.

मतमोजणीला सहकार विभागाचे ऐकूण ३१ कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया एस.टी.केदार सहायक निबंधक यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडली. मतमोजणीवेळी स्थानिक पोलिस प्रशासनाने, कायदा व सुव्यवस्था चोख राखली तर सहकार पॅनलने विजयाचा जल्लोष केला.

Leave A Reply

Your email address will not be published.