हिंदू नववर्षारंभ : चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा

0

 

गुढीपाडवा लोकशाही विशेष

चैत्रशुद्ध प्रतिपदेस गुढीपाडवा हे नाव आहे. या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष या दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारतात व भारताच्या इतर भागात नूतन वर्षारंभ चैत्र प्रतिपदेलाच होतो. या दिवशी काही धार्मिक विधी सांगितले आहेत. त्यात ब्रह्मपूजा हा महत्त्वाचा विधी असतो. याचा इतिहास ब्रह्मपुराणात व तिथून घेऊन व्रतराजात सांगितला आहे. तो असा.

 

चैत्र मासे जगद् ब्रह्मा ससर्ज प्रथमेहनि |

शुक्लपक्षे समग्रे तु तदा सूर्योदये सति ||

प्रवर्तयामास तथा कालस्य  गणनामपि |

तत्र कार्या महाशान्ति: सर्वकल्मषनाशिनी ||

सर्वोत्पातप्रशमिनी कलिदु:स्वप्ननाशिनी |

 

अर्थ –  ब्रह्मदेवाने चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सकाळी समस्त जग निर्माण करून कालगणना ही सुरू केली. त्यातील सर्व उत्पात, सर्व पापे व कलीकृत दुःख स्वप्ने यांचा नाश करणारी महाशांती करावी.

 

ब्रह्मदेवाची पूजा झाल्यानंतर विपळे, पळे, घटिका, प्रहर इ. सर्व कालविभागांची, दशकन्यांची व विष्णूंची पूजा करावी. ब्राह्मण भोजन घालावे. आप्तेष्टांना भेटवस्तू द्याव्या. घरातील सर्व माणसांनी व स्त्रियांनी तैलाभ्यंग करून उष्णोदकाने स्नान करावे. नंतर कोवळी कडुलिंबाची पाने भक्षण करावी. कळकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा तांब्याचे भांडे किंवा तांब्या पालथा मारून त्याला कडुलिंबाचे पाने बांधून फुलांची माळ व साखरेच्या गाठींचा हार घालावा व ते दारात उभे करून पंचोपचार पूजा करून ती गुढी उभारावी, यालाच पाडवा असे म्हणतात. दुपारी मिष्टांन्नाचे भोजन करून पंचांग वाचन पंचागस्था गणपतीचे पूजन करतात.

या तिथीला युगादी तिथी ही म्हणतात. याच दिवशी शक्य असेल तर पाणपोई लावावी किंवा उदक कुंभ दान करावा. गरिबाला माठ दान करावा असे देखील सांगितले आहे.

 

काठी वेळूची – सामर्थ्याचे प्रतिक

कडुलिंबाची पाने – आरोग्याचे प्रतिक

साखरेची गाठ –  माधुर्याचे प्रतिक

रेशमी वस्त्र –  वैभवाचे प्रतीक

तांब्याचा / चांदीचा तांब्या – यशाची प्रतीक

 

कृती – कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेचे कालवून त्यात मिरे हिंग व साखर प्रमाणात कालवून ते भक्षण करावे याने आरोग्य प्राप्ती होते. (संदर्भ – दाते पंचांग)

 

=========================================

शब्दांकन

श्री.त्रिषिकेश जोशी (कीर्तनकार)

९१३००२००३५

Leave A Reply

Your email address will not be published.