सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

0

कर्जत : कर्जत तालुक्यातील ४० वर्षीय व्यक्तीने समाजातील बापलेकीच्या नात्याला काळिमा फासला आहे. आपल्या १४ वर्षांच्या सावत्र मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत अनैतिक संबंध ठेवल्याने ती मुलगी ८ महिन्यांची गरोदर आहे. दरम्यान, नेरळ पोलिसांनी या प्रकरणी त्या व्यक्तीला अटक केली आहे.

सलमान अस्लम शेख असे त्याचे नाव आहे. त्याने हिंदू महिलेसोबत लग्न केले. या महिलेचे हे दुसरे लग्न असून, पहिल्या पतीपासून १४ वर्षांची मुलगी आहे. मूळची परभणी जिल्ह्यातील पीडित मुलगी, तिची आई व सलमान हे एका चाळीमधील खोलीत एकत्र राहतात. दरम्यान, त्याने या मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत सप्टेंबर २०२२ रोजी मुलगी १२ वर्षांची असल्यापासून तिच्याशी अनैतिक संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली.

तिने आईला सांगेन, असे सांगितले असता, तो ठार मारण्याची धमकी द्यायचा. त्यातून ही मुलगी ८ महिन्यांची गरोदर राहिली. या प्रकरणी मुलीच्या आईने नेरळ पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केली. त्यावर पोलिसांनी सत्यता पडताळून सलमान शेखविरोधात गुन्हा नोंद केला व पोलीस उपअधीक्षक डी. डी. टेले यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सलमान अस्लम शेख याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या सह पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.