जळगाव ;- धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड असा निकाल सोमवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता दिला आहे. योगेश दिनकर कोळी रा.डांगरी ता. अमळनेर असे आरोपीचं नाव आहे.
धरणगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. ६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजता अल्पवयीन मुलगी ही प्रातःविधी करण्यासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी आरोपी योगेश दिनकर कोळी याने तिच्या मागून येवून तिचे तोंड दाबत तिला एका जुन्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच जर तू ओरडली तर तुला जीवेठार मारेल अशी धमकी दिली होती. त्यानंतर रात्री साडेबारा वाजता पीडित मुलगी घरी गेल्यावर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानुसार ७ डिसेंबर २०२१ रोजी आरोपी योगेश दिनकर कोळी यांच्यावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल करण्यात आले. न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी, पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यानुसार न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवत १० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार ताराचंद जावळे यांनी काम मदत केली. सरकार पक्षातर्फे जिल्हा शासकीय वकील सुरेंद्र कांबळे यांनी काम पाहिले.