राष्ट्रीय एकता शोभा यात्रेत विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन

0

जळगाव ;- दहा राज्यांमधील २०० पेक्षा अधिक तरूणाईने राष्ट्रीय एकता शोभा यात्रेत आपआपल्या राज्यातील संस्कृतीचे दर्शन विभिन्न वेशभुषा, नृत्य आणि लोककला याद्वारे दाखवत जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले.

भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागीय संचालनालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरात विविध राज्यातील विद्यार्थ्यांची शोभायात्रा सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी काढण्यात आली. शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयापासून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. हिरवी झेंडी दाखवतांना प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे व नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रा.से.यो. चे विभागीय संचालक अजय शिंदे, प्राचार्य एस.एन. भारंबे, रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे, रा.से.यो. समन्वयक डॉ. हेमंत पाटील, डॉ. दिनेश पाटील,प्रा. विजय पाटील, प्रा. विश्वास भामरे, प्रा. मनिष करंजे, प्रा. भुयारे, प्रा. नितीन बडगुजर, प्रा.भुपेंद्र केसुर आदी उपस्थित होते. प्रा. जयश्री भिरूड यांनी सूत्रसंचालन केले.

नुतन मराठा महाविद्यालयाजवळ या शोभायात्रेचा समारोप झाला. राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक आदान-प्रदान यांना प्रोत्साहन देणा-या या शोभायात्रेत मिनी भारताचे दर्शन जळगावकरांना झाले. दहा राज्यातून सहभागी झालेल्या रा.से.यो. स्वयंसेवकांनी आपआपल्या राज्यातील पारंपरिक वेशभुषा परीधान केली होती. त्यात मध्यप्रदेशातील विद्यापीठाने महाकाल सवारी, गणगौर नृत्य आणि तेथील भिलाला आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. गुजरात येथील विद्यापीठाने गरबा नृत्य व त्याला साजेशा पोषाख आणि गुजराती संस्कृतीची माहिती करून दिली. आसाम राज्यातील विद्यापीठाने आसामी नृत्य व कलाद्वारे आपल्या संस्कृतीचे दर्शन दिले.

कर्नाटक राज्यातील विद्यापीठांनी कुरकु डान्स या प्रख्यात नृत्याचे सादरीकरण कर्नाटकी पेहरावातून केले होते. तेलंगाना राज्यातील विद्यार्थी/ विद्यार्थिंनी यांनी घुमर आणि बरगुमा हा नृत्याविष्कार सादर केला, गोवा राज्यातील विद्यार्थ्यांनी शिगमो डान्स करत आपल्या राज्यातील ओळख करून दिली. केरळातील विद्यार्थ्यांनी मल्याळम गीत आकर्षक केरळी पेहऱ्याव्याद्वारे सादर केले. ओरीसा राज्यातील विद्यार्थ्यांनी संबलपुरी नृत्य व देश रंगीला नृत्य मोहक पेहराव करून सादर केले. राजस्थान येथील विद्यार्थ्यांनी प्रसिध्द असा पद्मनि जोहर नृत्य नाटीका खास राजस्थानी पोषाखातून मांडले. महाराष्ट्रातील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भजन, वारी, समाजसेवा, स्वच्छ भारत आदी मुद्यांवर तसेच लोककलेचे दर्शन देणारा पोषाख करून महाराष्ट्राची ओळख करून दिली. या रॅलीच्या सुरुवातील महात्मा गांधी व भारत माता यांच्या प्रतिकात्मक पोषाखातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मततेचे दर्शन घडविले.

Leave A Reply

Your email address will not be published.