जाता पंढरिसी सुख वाटे जीवा । आनंदे केशव भेटतांचि.. ॥

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

वारकरी संप्रदायातील संत श्रेष्ठ सेना महाराज यांचा हा भावपूर्ण अभंग पंढरपूरचे महिमा वर्णन करणारा ‘संताची अभंगवाणी’ या पुस्तकातला आहे. संत सेना महाराज वारकऱ्यांना या अभंगाव्दारे सांगतात. जीवाला आनंदाची प्राप्ती हवी आहे ना ? मग चला पंढरपूरला तेथील अनंतकोटी ब्रमहांडनायक भक्तांचा पाठीराखा केशव  विटेवर उभा आहे त्याची भेट झाली की, आनंद वाटेल, समाधान होईल. दर्शनी समाधानाने मन, चित्त, काया टवटवीत होईल. पंढरपूर ही नगरी भू लोकीचे वैकुंठ आहे.

या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी । पाहिली शोधूनी अवघी तिर्थे ।

एैसा नामघोष ।  एैसे पताकांचे भार । एैसे वैष्णव डिगर दावा कोठे ॥

इथल्या सुखाची उपमा कुणालाच देता येणार नाही. पंढरी नगरीत देवांचा देव विटेवर उभा आहे. रात्रंदिवस पंढरीत विठ्ठल-विठ्ठलाचा नामघोष सुरु असतो. या सुखाची उपमा त्रिभुवनात स्वर्ग, पृथ्वी, पाताळात कुणालाही देता येत नाही. अनेक तिर्थे पाहून घ्या एवढंच नाही हया भूतलावर पंढरपूर सारखं तिर्थक्षेत्र दुसरे अन्यत्र नाही. स्वयंभू पांडुरंग इथं उभा आहे. वामांगी डाव्या हाताला जगन्माता आदिशक्ती रुख्मिणी माता उभी आहे. भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत एवढा रममाण झाला आहे की, त्याला भगवंतासाठी काय करावे ? म्हणून त्याने आपल्या जवळ असलेली विट विठुरायाच्या चरणाजवळ भिरकावून दिली.  मग भगवंताला सांगितले यावर उभे राहा.  माझी आई वडिलांची सेवा संपली की; मी तुमची विचारपुस करीन त्या दिवसापासुन आज तागायत २८ युगे झाली पुंडलिकाची सेवा सुरु आहे. ‘समचरण वृत्ती विटेवरी साजिरी !’  या न्यायाने भक्तांचा हा लाडका भगवंत अजून उभा आहे. निर्मळ भाव, शुद्ध अंत:करणाच्याा गाभाऱ्यातून निघालेला अनहत ध्वनी ‘रामकृष्ण हरी’ हा षडाक्षरी मंत्र एवढंच भगवंताला समर्पित करा तो फक्त याच भक्ति भावाचा भुकेला आहे. अशी  मनापासून केलेली भक्ति त्या परमेश्वराला मोक्ष पदाला नेण्यास पुरे आहे.

संत सेनाम हाराज न्हावी, नापित होते आपला व्यवसाय करतांना ते भगवंताची मनोभावे भक्ति करायचे. विठु माझा लेकुरवाडा । संगे गोपाळांचा मेळा ॥ या अभंगानुरुप भगवंताची भक्ति  संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, ज्ञानेश्वर माऊली, चोखोबा, निळोबा, जनाबाई, बहिणाई, गोरोबा कुंभार, सावता माळी या अठरा पगड जाती धर्माच्या लोकांनी देवाला आपलासा केला. या संताची भक्ति एवढी उच्चतम होती म्हणून देव सावता माळीकडे मोट हाकलायचा, जनाबाईचं दळण करायचा, सजन कसायाकडे मांस विकायचा म्हणून  या संतांनी अधिकार वाणीनं त्याला हृदय बंदिखाना केला. आंत विठ्ठल कोंडियेल तेव्हा तो वेळोवेळी भक्तांवरील संकट दूर करण्यासाठी धावून यायचा..!

कलीयुगात संसारी मानवाला देवाचे भजन, शुद्ध सात्वीक आचरण, मुखात रामकृष्ण हरी, गळयात तुळशी माळ , कपाळी गंध असं वारकरी सारखं जीवन जगण्याचं परिमाण लाभलं की, सुख तुमच्या दारी लोळण घेत आहे असे वाटल्याशिवाय राहणार नाही ? आषाढी कार्तिकीची वारी करावी. धन संपत्ती पैसा अडका सोने चांदी हे सगळं मायेचा पसारा आहे. मुलगा – सुन पत्नी हे वार्धक्यात वागतील हा भ्रम आहे.  जीवन असं जगलं पाहिजे की मृत्युनंतर आपला देहाचा चंदन व्हावा त्याचा सुगंध किर्ती पंचक्रोशीत पसरला पाहिजे.   हे कमवू ते कमवू या भ्रम मोहाने अनेक गेले, एके दिवशी आपला माझा तुमचाही पाढा वाचला जाईल आणि हे सारे इथंच राहिल म्हणून “अंत:काळी तैसा संकटाचे वेळी हरि तया सांभाळी अंतर्बाहया” या हरिपाठातील ओवीनुरुप भगवत भक्तिची गोडी लागली तर संसार मृतप्राय, अशाश्वत, भ्रम, मृगजळासारखा वाटू लागेल.

 एैसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक । एैसा वेणुनादी काला दावा कोठे ॥

     ऐसा विटेवरी उभा कटेवर कर । ऐसे पाहता निर्धार नाही कोठे ॥

पंढरीनगरीत विठ्ठलाच्या  चरणाजवळ वाहत असलेली चंद्रभागा तसेच आपल्या भक्तीच्या बळावर पांडुरंगाला पंढरीत आणणारा पुंडलिक अन्यत्र कुठेही नाही. व्दापार युगाचा अस्त व कलीयुगाचा प्रारंभ याा संक्रमण युगपरिवर्तनीय काळात कृष्णा पुढे पंढरीत पांडुरंगाच्या रुपाने अवतरीत झाले. पांडुरंगाच्या भेटीमुळे मला संत संगती लाभली. मला भक्तिची खुनगाठ संतानी दिली. मन:शांती व परमानंदाची अनुभूती मला पांडुरंगाने दिली असे संत सेनाा महाराज म्हणतात.

 

रमेश जे पाटील

आडगाव ता. चोपडा

जि. जळगाव [खान्देश]

मो. ९८५०९८६१००

 

Leave A Reply

Your email address will not be published.