संधिवातावर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय !

0

लोकारोग्य विशेष लेख

सांध्यांचे दुखणे म्हणजेच संधिवात हा आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.  पूर्वी फक्त वृद्धावस्थेत होणारा हा आजार आजकाल तरुण वयातही वाढलेला दिसत आहे आयुर्वेदानुसार वात पित्त व कफ हे तीन दोष आपल्या शरीरातील सर्व क्रियांना कारणीभूत आहेत जसे की कफदोष हा शरीराच्या स्थिरतेसाठी व वाढीसाठी उपयुक्त आहे पित्तदोषामुळे शरीरातील चयापचयच्या क्रिया चालतात आणि वातदोष हा शरीरातील सर्व हालचालींना कारणीभूत आहे.

हे तीनही दोष जेव्हा संतुलित अवस्थेत असतात तेव्हा त्यांची कार्य ही शरीरात व्यवस्थित सुरू असलेली दिसतात.

मात्र जेव्हा या दोषांमध्ये असंतुलन होते किंवा ते दोष वाढलेले अथवा कमी झालेले दिसतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले दिसून येतात. शरीरात जिथे कुठे वेदना आहेत तिथे वातदोष हा बिघडलेला असतो. पावसाळ्यात संधीवाताचे दुखणे हे वाढलेले आढळून येते कारण वर्षा ऋतू हा वातप्रकोपाचा काळ आहे या काळात वाताचे आजार डोके वर काढतात त्यापैकीच एक हा संधिवात.

संधिवाताचे दुखणे पूर्ण बरे होण्यासाठी त्याचे योग्य निदान होणे आवश्यक आहे.  आयुर्वेदात याचा खूप खोलवर विचार केलेला आहे,  याला आयुर्वेदात संधीगतवात असेही म्हणतात आणि याचे विविध प्रकारही सांगितलेले आहेत. संधीगतवात म्हणजेच ओस्टीओ आर्थाइटिस. यामध्ये शरीरातील वातदोष प्रकृतीत झाल्याने तो सांध्यांमध्ये प्रचंड वेदना सूज निर्माण करतो. तसेच त्यामुळे सांध्यांच्या हालचाली कमी होतात (रेस्ट्रिक्टेड जॉईंट मुव्हमेंट्स) सांध्यांमधून कटकट असा आवाज येतो सांध्यांची झीज झालेली असते आणि चालतानाही खूप त्रास होतो.

आता याची कारणे काय आहेत ते पाहूया सततचा कोरडं रुक्ष व थंड जेवण करणं तसंच अति तिखट तुरट आणि कडू पदार्थांचे सतत सेवन करणे शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम व अतिशय कामे करणे सतत उपवास करणे चिंता स्ट्रेस तसंच जुनाट आजारांमुळे शारीरिक शक्ती कमी झालेली असणे अपघात यामुळे फ्रॅक्चर होणे किंवा लिगामेंट इंजुरी होणे, व्यायामाचा पूर्ण अभाव कुपोषण किंवा अतिपोषण या सर्व कारणांमुळे वातदोष प्रकृतीत होतो आणि संधिवात होतो.

संधिवाताची लक्षणे 

सांध्यांमध्ये वेदना होणं, सूज येणे, सांधांच्या हालचाली कमी होणे किंवा बंद होणे, चालताना अतिशय त्रास होणे, जास्त वेळ बसल्यावर किंवा झोपल्यावर पटकन चालता न येणे, सांध्यांच्या हालचालीवर मर्यादा येणे, मोठ्या सांध्यांमध्ये जास्त वेदना होणे, जसे कंबर गुडघे इत्यादी जास्त दुखणे ही सर्व लक्षणे आपल्याला संधिवातामध्ये दिसून येतात.

यावरील उपचार 

संधीवातामध्ये उपचार करताना  सांध्यांच्या अवस्थेचा विचार करावा लागतो.  सांध्यांमध्ये फक्त वेदना असतील कटकट आवाज येत असेल परंतु सूज नसेल तर बाह्य तसेच अभ्यंतर स्नेहन म्हणजेच सांध्यांना तेल लावणे व पोटातूनही वात शामक औषधांनी सिद्ध केलेले तूप घेणे असे उपचार करावे.  तसेच स्वेदन म्हणजेच शेकवून काढावे काही लेपही सांध्यांना लावता येतात.  जसं सुंठीचा, एरंड, निरगुडीच्या पानांचा लेप याचा चांगला उपयोग होताना दिसतो. तसंच एरंड व निरगुडीच्या पानांची पोटली करून त्याच्याने शेकवलं तरी छान फायदा होतो.

मात्र जेव्हा सांध्यांना सूज आलेली असते सांधे आरक्त वर्णे झालेले असतात तिथे स्पर्शासहत्व असते त्यावेळी बाह्य व अभ्यंतर असे दोन्ही प्रकारचे स्नेहन हे वर्ज्य सांगितलेले आहेत. अशावेळी तिथे आल्याचा रस काढून लावणे. वाळू किंवा विटेने शेकवणे हे उपयोगी ठरते. आयुर्वेदातील पंचकर्म संधीवातासाठी अत्यंत उपयोगी आहे. तत्काळ वेदना कमी करण्यासाठी अग्निकर्म व रक्त मोक्षणाचा उत्तम उपयोग होतो. रक्त मोक्षनानंतर सांध्यांची सूज व वेदना त्वरित कमी होते.  रक्त मोक्षण म्हणजे सांध्यांजवळील सिरेतून 30 ते 50 मिली रक्त सिरींजने काढून घेणे किंवा जळवा लावून रक्तमक्षण करणे.

बस्ती हा पंचकर्मातील महत्त्वाचा प्रकार बस्तीमुळे वातदोषाची अर्धी चिकित्सा होते. म्हणूनच बस्ती संधिवातामध्ये खूप उपयोगी आहे. यामध्ये औषधी सिद्ध तेल व काढ्याचा उपयोग केला जातो. पावसाळ्यात बस्ती करून घेतले तर त्याचा विशेष फायदा होतो . वर्षा ऋतूमध्ये वातदोष जास्त प्रकुपित असतो व सांध्यांचे दुखणे वाढलेले असतात. ‌ बस्तीमुळे वातदोषाचे आतून संतुलन व्हायला मदत होते आणि वाताचे त्रास कमी होतात. तसेच विविध वात शामक औषधांच्या काढ्याने शेकवणे नाडीस्वेद, पिंड स्वेद, विविध औषधी सिद्ध पानांनी पोटली बनवून त्याचे शेक त्यामुळे सांध्यांची सूज व वेदना कमी व्हायला मदत होते.

संधीवाताचे दुखणे कमी करण्यासाठी आहारात गाईचे दूध तूप यांचा नियमित समावेश करावा. घरचे गरम ताजे पचायला हलके असे जेवण करावे. कॅल्शियम युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे, योग्य व्यायाम आणि योगासन करावे आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच व्यायाम करावा.  आहारात लसूण,आले, हिंग, सुंठ यांचा वापर करावा.  सुंठ टाकून 15 मिनिटे उकळलेले पाणी पिण्याकरता वापरावे. रात्री झोपताना एरंडेल तेल गरम पाण्यासह चिमूटभर हिंग टाकून घ्यावे. एरंडेल तेलाची मात्रा आपल्या कोठ्यानुसार ठरवावी भाकरी किंवा चपाती करताना एरंडेल तेल वापरावे महिलांमध्ये मेनोपॉजनंतर सांधेदुखी जास्त आढळून येते.  त्यामुळे त्यांनी आहारात योग्य बदल करावे योग्य व्यायाम मेडिटेशन हे तर हवेच.

नियमित अभ्यंग हे वातदोषाला संतुलित ठेवते त्यामुळे नियमित अंगाला तेल लावावे. किमान आठवड्यातून एकदा तरी अभ्यंग करावे.  वाढत्या वयापरत्वे रोज रात्री गुडघे कंबर इत्यादी ठिकाणी तेल लावावे त्यामुळे वातदोषाला संतुलित ठेवायला मदत होते. कारण वात दोष बिघडला तर तो पित्त आणि कफ दोषालाही बिघडवून इतरही त्रास होऊ शकतात म्हणून नियमित व्यायाम योग्य आहार योग्य झोप हे अत्यंत महत्त्वाचे आहेत.

 

डॉ. लीना बोरुडे

आयुर्वेदाचार्य पंचकर्म व वैद्यक योग तज्ञ. 

आंतरराष्ट्रीय योग तज्ञ

आयुष योग तज्ञ

Leave A Reply

Your email address will not be published.