फ्रँजाईजीच्या नावाखाली महिलेला ७ लाखात गंडवले; ५ जणांवर गुन्हा

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील नगाव खुर्द येथील महिलेला रेडीमेड गारमेंटची फ्रँजाईजी देण्याच्या नावाखाली सात लाख रूपयांमध्ये फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील नगाव खुर्द येथील रेखा नारायण शिंपी यांनी अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेनिम हब लाइफ स्टाइल प्रायव्हेट लिमिटेड या रेडिमेड गारमेंट्स विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी त्यांना फ्रँचायसी हवी होती. यासाठी त्यांनी परमेश बालाजी पाटील (रा. काकागुडा सिकंदराबाद), नामदेव ध्रुवकुमार शिंपी (रा. दादावाडी, जळगाव), योगेश रमेश कुलकर्णी (रा. रामानंद नगर, जळगाव), नरेंद्र नारायण पवार (रा. भुसावळ), साईनाथ बालाजी पाटील (रा. कापरा, सिकंदराबाद) यांच्याशी संपर्क साधला.

या संशयितांनी १७ जुलै २०१९ ते १ जुलै २०२१ दरम्यान त्यांनी रेखा शिंपी यांच्याशी कंपनीची फ्रेंचाईची घेण्यासंदर्भात १९ जुलै २०१९ रोजी करार केला होता. त्यात त्यांच्याकडून ७ लाख रुपये घेऊन धुळे येथे शोरूमसाठी दुकानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. त्यानुसार रेखा शिंपी यांनी धुळे येथील वाडी भोकर रोडला दुकान घेऊन त्याचे भाडे ठरवले. मात्र, काही दिवसांनी माल देणे बंद केले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यानंतर रेखा शिंपी यांनी अनामत रक्कम परत मागितली असता योगेश कुलकर्णी यांनी नोटरी करून अनामत परत करेपर्यंत दरमहा २० हजार रुपये देण्याचे मान्य केले. मात्र, आजपर्यंत काहीच न दिल्याने रेखा शिंपी यांनी अमळनेर पोलिसांत परमेश बालाजी पाटील (रा. काकागुडा सिकंदराबाद), नामदेव ध्रुवकुमार शिंपी (रा. दादावाडी, जळगाव), योगेश रमेश कुलकर्णी (रा. रामानंद नगर, जळगाव), नरेंद्र नारायण पवार (रा. भुसावळ), साईनाथ बालाजी पाटील (रा. कापरा, सिकंदराबाद) या पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.