व्यावसायिक अजय ललवाणीसह चौघांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव येथील व्यावसायिक अजय ललवाणी यांच्यासह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इच्छापत्रात असलेल्या मिळकतीच्या हिश्श्यात बदल करून त्यावर मयत इसमाची बनावट स्वाक्षरी व अंगठा लावून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली संशयित जयेश मुकेश ललवाणी, रोहन मुकेश ललवाणी (दोघे रा. शिरसोली रोड) राजेश शांतीलाल ललवाणी (रा. जयनगर) व अजय शांतीलाल ललवाणी (रा. शिरसोली रोड) या चौघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आर्किटेक्ट दिलीप आनंदा कोल्हे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण ? 

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या मौजे मेहरूण शिवारात 464/1 मध्ये फिर्यादीसह राजेश ललवाणी, कै. मुकेश शांतीलाल ललवाणी (दोघे रा. जयनगर) व श्रीराम गोपालदास खटोड अशा चौघांनी मिळून दि. 13 नोव्हेंबर 2001 रोजी अदलाबदल खत दस्त क्र. 6351 नोंदणीकृत दस्तान्वये घेतली आहे. यापैकी मुकेश ललवाणी हे 5 ऑक्टोबर 2020 रोजी मयत झाले आहेत.

दिलीप कोल्हे यांना मुकेश ललवाणी यांचे इच्छापत्र 15 जून 2021 या तारखेला मिळाले. इच्छापत्रातील जयेश ललवाणी व रोहन ललवाणी यांनी त्या मिळकतीची विभागणी केली. त्या मिळकतीवर साक्षीदार म्हणून राजेश ललवाणी व अजय ललवाणी यांच्या सह्या आहेत. आर्कीटेक्ट दिलीप कोल्हे यांनी कागदपत्रांची तीन हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासणी केली. त्या तपासणीत सही व अंगठा खोटा असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. इच्छापत्राच्या आधारे संबंधित तलाठी यांनी मयत मुकेश यांचे वारस म्हणून जयेश व रोहन ललवाणी यांच्या नावाची नोंद उताऱ्यात केल्याचे फिर्यादीत म्हटले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उप निरीक्षक प्रदिप बोरुडे करत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.