कापसाला भाव मिळण्यासाठी आता महादेवाला साकडे

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी यांच्या कापसाला भाव मिळत नसल्याने त्रस्त आहे. शासनाने घोषित केलेल्या हमीभावा पेक्षाही कमी भावाने कापूस विक्री होत असल्याने गतवर्षी उत्पादित झालेला ४०% कापूस शेतकऱ्याच्या घरात पडून आहे. यावर्षी सुद्धा कापसाला प्रतिक्विंटल ६५०० इतकाच भाव मिळतोय. कापसाच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव कापसाला मिळतोय. त्यामुळे शेतकरी गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र शासनानेकडे मागणी करतोय. परंतु आपली सत्ता टिकवण्यात मग्न असलेल्या सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्या मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तथापि न्यायालयाकडूनही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला नाही. शेवटी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी देवाचे देव महादेव यांना कापूस भावासाठी साकडे घातले आहे. जामनेर तालुक्यातील पहुर येथे कापूस उत्पादक शेतकरी कुटुंबाने सपत्नीक एकत्र येत महादेवाला सामूहिक अभिषेक करून कापसाला भाव वाढवून मिळावा अशी मागणी केली. सर्व प्रयत्न फसले, त्यांच्या प्रयत्नाला यश येत नाही, असे दिसून आल्यावर देवाला साकडे घालून न्याय मागितला जात आहे. महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांची दिशाभूल केली जातेय. शेतकऱ्यांची फसवणूक होतेय. आता सरकारकडून न्याय मिळत नसल्याने हतबल झालेले शेतकरी देवाला साकडे घालत आहेत. हे शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. सध्या कापूस उत्पादक शेतकरी त्याच्या कापसाला भाव मिळत नसल्याने हैराण आहे. सोयाबीनला भाव मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरही कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. कारण कांदा काढणीचा खर्च आणि तो शेतातून काढल्यानंतर मार्केटमध्ये नेण्याचा खर्च सुद्धा त्याला मिळत नसेल तर कांदा रस्त्यावर फेकण्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे आता आपल्याला देवच वाचवू शकतो. म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न देवासमोर मांडण्याचा प्रयत्न करत पहूर येथील शेतकरी सुरेखा घोंगडे, तुषार बनकर, अनिल घोंगडे, विनायक राऊत, संदीप बनकर, युवराज बनकर यांनी सपत्नीक महादेवाला अभिषेक साकडे घातले.

आपला देश कृषीप्रधान देश आहे. ७० टक्के जनता शेतकरी असून शेतीवर अवलंबून आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांचे हाल होत आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाची अवकृपा झाली की पाऊस उशिरा पडतो, पेरण्या उशिरा होतात आणि पाऊस वेळेवर आला, पेरण्या व्यवस्थित झाल्या, की वादळी वारा गारपीट पिकांचे मोठे नुकसान होते. त्यात उत्पादन घटते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडते. या दुष्काळात महाराष्ट्र तसेच देशातील शेतकरी सापडला आहे. त्यातच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडते. शेतकरी अजूनही असंघटित असल्याने त्याचा शासनापर्यंत आवाज पोहोचत नाही आणि शासनावर ते दबाव टाकू शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी राजकीय सत्तेत मशगुल आहेत. त्यामुळे बिचाऱ्या शेतकऱ्यांना आता देवच तारू शकतो असे वाटत असल्याने देवाला साकडे घातले जात आहे. ही बाब शासनाच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी आहे, असे म्हणता येईल. आता त्यावर एकच उपाय म्हणजे आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपल्या मताच्या अधिकाराचा हिसका टाकून त्यांना घरी बसवावे हीच योग्य होय…!

Leave A Reply

Your email address will not be published.