ॲड प्रवीण चव्हाण यांच्या अटके मागचे षडयंत्र

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव नगरपालिकेचा घरकुल घोटाळा, बी एच आर मल्टीस्टेट पतपेढी घोटाळा, मराठा विद्या प्रसारक मंडळ प्रकरणात गाजलेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Advocate Praveen Chavan) यांना जळगाव पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली. आता जामीन मिळवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. याआधी खंडपीठात गुन्ह्यात चव्हाण यांना अटकपूर्व जामीन मिळाला आणि किरकोळ फसवणुकीच्या गुन्ह्यात मात्र त्यांना अटक झाली. याच फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी अँड विजय पाटील आणि किरण साळुंखे यांना अटकपूर्व जामीन मिळाली परंतु त्याच केसमधील हे वाढीव आरोपी असलेले अॅड प्रवीण चव्हाण यांना अटक होते, हा कायद्याच्या दृष्टीने चर्चेचा विषय बनला असला तरी सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी अटकेत असलेल्या प्रवीण चव्हाण यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर जमिनीसाठी युक्तिवाद होऊ शकला नाही. त्यामुळे गुरुवार दिनांक २ मार्चपर्यंत ॲड प्रवीण चव्हाण यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.

नियतीचा खेळ किती चमत्कारिक म्हणावा लागेल. जळगाव घरकुल घोटाळा बी एच आर पतपेढी (BHR Credit Bank Scam) घोटाळा आणि मराठा विद्या प्रसारक प्रकरणात सरकारी वकील म्हणून चव्हाण यांनी अख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. घरकुल घोटाळ्यातील आरोपींना शिक्षा झाली. त्यामुळे अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले. पतपेढीमध्ये सुद्धा आरोपींकडून मोठ्या प्रमाणात ठेवीदारांचा ठेवी मिळून देण्यात चव्हाण यशस्वी झाले. तसेच मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या घोटाळ्यात आरोपींना सळो की पळो करून सोडले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना मोक्का लावण्यापर्यंत कोर्टात प्रगती झाली होती. तथापि अनेक आरोपी विरुद्ध कोर्टात जोरदार युक्तिवाद करून ॲड प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकिलीचा दबदबा निर्माण केला होता. अनेक खटल्यांमध्ये ते सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत होते. एवढ्या चाणाक्ष, अभ्यासू असलेल्या वकिलांचा भांडाफोड एक स्टिंग ऑपरेशन मधून झाला. विधानसभा अधिवेशनात तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि आताचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ॲड प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन अनेक मुद्द्यांद्वारे सादर करून त्याबाबतची संपूर्ण रेकॉर्डिंग असलेले दोन पेन ड्राईव्ह विधानसभा अधिवेशनात सादर केले आणि चव्हाण विरोधात उलटे फासे फिरायला सुरुवात झाली. चव्हाण यांनी आपल्या सरकारी वकील पत्राचा राजीनामा सादर केला आणि घरकुल घोटाळा बीएच आर पतपेढी घोटाळा आणि मराठा विद्या प्रसारक मंडळ प्रकरणात केलेल्या गौरवशाली कार्याबाबत त्यांच्या पाहणीची संशयाची सुई प्रत्येकाच्या मनात घर करून गेली. परंतु ॲड प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक होते, यावरून आपला कायदा किती पारदर्शक आहे हे स्पष्ट होते.

घरकुल घोटाळा बीएचआर पतपेढी आणि मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या खटल्यातील माध्यमांमध्ये आल्याने राजकारणातील एक गट खुश होता तर प्रतिस्पर्धी गट नाराज होता. या खटल्यातील दैनंदिन युक्तीवादाच्या वृत्तासाठी माध्यमांमध्ये जणू स्पर्धाच निर्माण झाली होती. त्यामुळे वृत्तपत्राच्या प्रथम पृष्ठावर रकानेच्या रकाने सविस्तर वृत्त छापून येत होते. सदर वृत्त वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. ॲड प्रवीण चव्हाण यांच्याकडून न्यायालयात जे जे घडले त्याचा वृत्तांत माध्यम प्रतिनिधींना मिळत होता. न्यायालयाचे कामकाज संपल्याबरोबर सर्व माध्यम प्रतिनिधी ॲड प्रवीण चव्हाण यांना गराडा घालत होते. त्यामुळे न्यायालयात अनेकांना आपल्या कौशल्याद्वारे आरोपींचे धाबे दणाणून सोडणाऱ्या ॲड प्रवीण चव्हाण यांना अटक होणे ही वृत्तपत्रासाठी आणि मोठी आणि महत्त्वाची बातमी होय.

सध्या प्रवीण चव्हाण यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्याविषयी भाष्य करता येणार नाही. तथापि या त्यांच्या अटकेमुळे त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीला मात्र काळा डाग लागला आहे. ॲड प्रवीण चव्हाण भलेही या केसमधून निर्दोष सुटूही शकतील, परंतु ‘जो बूंद से गई वह हौद से नही आती’ हा जो वाक्प्रचार आहे तो इथे ॲड प्रवीण चव्हाण यांच्या संदर्भात तंतोतंत लागू होतो. त्यांच्या अटके मागे राजकीय षडयंत्र असण्याची चर्चा आहे. अलीकडे राजकारणात ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ या प्रकाराचा क्षणोक्षणी अनुभव येतोय. महाराष्ट्रात सत्ता बदल होताच ॲड प्रवीण चव्हाण यांच्या मागे शुक्लकाष्ट लागले असे म्हटले जाते. त्यात कितपत सत्यता आहे, हे काळच ठरवेल. परंतु आजमितीला ॲड प्रवीण चव्हाण यांचा मात्र जेलच्या मुक्काम आहे एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.