धक्कादायक; करवा चौथच्या दिवशीच पतीने फेकले पत्नीवर अॅसिड…

0

 

नोएडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

वैदिक मान्यतेनुसार पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी 1 नोव्हेंबरला देशभरात करवा चौथचा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला, मात्र या दिवशी नोएडातील बिसरख परिसरात एक वेदनादायक घटना समोर आली आहे. येथील रोजा जलालपूर गावात करवा चौथच्या दिवशी एका व्यक्तीने पत्नीवर अॅसिड फेकले, त्यात ती गंभीरपणे भाजली आहे.

अतिरिक्त पोलिस उपायुक्त (झोन II) हृदेश कथेरिया यांनी सांगितले की, बुलंदशहर जिल्ह्यातील सलेमपूर गावातील मूळ रहिवासी असलेल्या विवेक कुमारचे २०२० मध्ये संभल जिल्ह्यातील शोभापूर गावातील रहिवासी असलेल्या ममतासोबत लग्न झाले होते आणि ते दोघेही आता रोजा जलालपूर येथे राहतात. बुधवारी करवा चौथच्या दिवशी पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला, त्यानंतर रागाच्या भरात विवेकने पत्नीवर अॅसिड फेकले. या घटनेत ममताचा चेहरा आणि शरीर गंभीररित्या भाजल्याचे त्यांनी सांगितले.

लग्नापासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता.

यानंतर आजूबाजूच्या लोकांनी ममताला ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल केले, तेथून तिची प्रकृती खालावल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात रेफर करण्यात आले. कथेरिया यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात पोलिसांना आढळून आले आहे की, पती-पत्नीमध्ये लग्नापासूनच वाद सुरू होता. त्यांनी सांगितले की, महिलेच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांनी अद्याप याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.