लोकशाही न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी २ जुलै रोजी मंत्रिपदाची शपत घेतली. एक आठवडा उलटूनही नव्या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अर्थ, महसूल, सहकार, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा अशी खाती मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, फडणवीस यांनी मध्यममार्ग काढून राष्ट्रवादीला अन्य खाती देण्यास मान्यता दिली. परंतु, अजित पवार (Ajit Pawar) यांना अर्थ खाते देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकमत झाल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, अजित पवार यांना अर्थ खात देण्यास शिंदे गटाच्या मंत्र्यांचा विरोध असून, हा विरोध कमी करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश मिळाले आहे. असेही सूत्रांनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १० आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे १० असे एकूण २० मंत्री होते. त्यात राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपत घेतल्याने ही संख्या २९ इतकी झाली.
तसेच, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा सुरु होती. अखेर, कुणाला कोणते खाते द्यायचे यावर तिन्ही नेत्यांचे एक मत झाले आहे. त्यामुळे आजच नवीन मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता आहे असे या सूत्रांनी सांगितले. तसेच, नव्याने खातेवाटप करण्यात येणार असून काही मंत्र्यांची खाती कमी करण्यात येणार आहेत.
सहकार खाते राष्ट्रवादीकडे
छगन भुजबळ- अन्न व नागरी पुरवठा, ओबीसी, बहुजन विकास
दिलीप वळसे पाटील- सहकार
धनंजय मुंडे- सामाजिक न्याय
अदिती तटकरे- महिला व बालविकास
हसन मुश्रीफ- वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक विकास
संजय बनसोडे- क्रीडा
अनिल पाटील- पशु व वैद्यकीय
धर्मराज बाबा आत्राम- आदिवासी कल्याण
या प्रमाणे नवीन मंत्र्यांना खातेवाटप होणार आहे असे या सूत्रांनी सांगितले.
आज रात्री होणार खातेवाटप?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज ‘शासन आपल्या दारी’ या शासकीय उपक्रमानिमित्त धुळे दौऱ्यावर आहेत. हा शासकीय दौरा संपवून मुख्यमंत्री मुंबईत परत आल्यानंतर खातेवाटपाच्या यादीवर अंतिम मोहोर उमटवली जाईल आणि रात्री ही यादी जाहीर केली जाईल असेही या सूत्रांनी सांगितले.