तो हा विठोबा निधान। ज्याचे ब्रह्मादिका ध्यान ।। पाऊले समान । विटेवर शोभती।।

0

 

लोकशाही आषाढी विशेष लेख

 

नेणो विठो मार्ग चुकला । उघडा पंढरपुरा आला ।।

भक्त पुंडलिके देखिला । उभा केला विटेवरी ।।

 

अनंत कोटी ब्रम्हांडनायक, राजाधिराज, पंढरपूरचा राजा वारकरी संप्रदायाचा आद्य दैवत म्हणून या पृथ्वीतलावर चराचर सृष्टीच्याही आधी ज्यांनी पंढरी नगरी निर्माण केली ते देवांचे देव म्हणजे विठोबा महाराज… पांडुरंग परमात्मा… या पांडुरंगाविषयी अनेक संत महात्मेयांनी आपल्या इष्टदेवाचा महिमा ग्रंथात वर्णन केला आहे. संत निवृत्तीनाथ म्हणतात न जाणून विठोबा महाराज कशी वाट चुकले कुणास ठाऊक पण अंगावरचे कपडे न घालता तो पंढरपुरात आला हे साक्षात पुंडलिकाने पाहिले आहे. ज्ञानेश्वरीत हे प्रमाण दिले आहे. निवृत्ती दास म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर माऊली ते पुढे म्हणतात;

 

रूप पाहता तरी डोलासू । सुंदर पाहता गोपवेषु ।।

महिमा वर्णिता महेशु । जेणे मस्तकी वंदीला ।।

 

विठोबाचे रूप पाहिले तर ते सुंदर व देखणे आहे. सोज्वळ आहे, आणि ते गोप वेशात म्हणजे गाई चारणाऱ्याच्या रूपात आहेत. एवढं असूनही साक्षात महादेव यांचे ध्यान करतात. जप तप करतात, त्यांनी या विठुरायाच्या मस्तकी आरुढ व्हावे? केवढी मोठी प्रीत महादेवाविषयीची विठूरायाला आहे. ब्रह्मादिक देव ऋषीमुनी त्यांचं ध्यान करतात ते हे निदान ठेवा आम्हाला सापडला आहे, असे सांगून माऊली म्हणतात;

 

भक्ति सुखे लाचावला । जाऊ नेदी उभा केला ।।

निवृत्ती दास म्हणे विठ्ठला । जन्मोजन्मी न विसंबे ।।

 

या पांडुरंगाला भक्ती सुखाचा लळा लागला आहे. म्हणून त्याला कुठेही अन्यत्र जाऊ न देता विटेवर उभा करून ठेवला आहे. भगवंता तुझा या जन्मात काय पण अनेक जन्मोजन्म तरी तुझा मला विसर पडणार नाही अशा ठिकाणी तू उभा आहेस. तुला कंटाळा येणार नाही फार फार तर आम्ही तुझ्या पायाजवळ पळून राहू. अशी काकुळतीची विनंती संतांनी केली आहे.

 

सावळे परब्रह्म आवळे या जीवा । मने राणीवा घर केले ।।

पंढरीच्या पांडुरंगाविषयी आम्हाला आमच्या जीवाची अवस्था काय सांगावी? हे सावळे परब्रम्ह एवढे आम्हाला प्रिय आहे की, या देवाने आमच्या हृदयात घर केले आहे. लाखो वारकऱ्यांचे हे आराध्य; युगे अठ्ठावीस झालेत तरी विटेवर उभे आहेत. हा देव स्वयंभू आहे. जगभरात पंढरपूर सारखे तीर्थक्षेत्र अन्य कुठेही नाही. म्हणून पंढरपूरला भूलोकीचे वैकुंठ म्हटले गेले आहे. पांडुरंग दर्शनाचा नेम वारकऱ्यांनी आखून ठेवला आहे. आधी चंद्रभागा स्नान, चंद्रभागेच्या वाळवंटात असलेल्या पुंडलिकाचे दर्शन, नामदेव महाराज चोखामेळा पायरीचे दर्शन आणि नंतर रांगेने विठोबाचे दर्शन. विठुरायाच्या दर्शनानंतर वामांगी रुक्माईचे दर्शन ,रुक्मिणी मातेच्या दर्शनानंतर सत्यभामा, कालिंदी, लक्ष्मी यांचे दर्शन राउळात तिरुपती बालाजीचे दर्शनही सहज होते. मगच मंदिरा बाहेर पश्चिम द्वारातून बाहेर पडता येते. गर्दीच्या वेळेला भगवान पंढरीनाथ रुक्मिणीमाता यांच्या मंदिरावरील कळसाचे दर्शन घेतले तरीही वारी सुफळ झाली असे होते. पंढरपुरात ‘देव द्यावा.. देव घ्यावा..’ या उक्तीनुसार एकमेकांची गळाभेट पायाला हात लावून नमस्कार व ‘माऊली माऊली’चा गजर या ठिकाणी अहोरात्र होत असतो. पंढरी नगरी देव भूमी आहे. चंद्रभागेचे वाळवंट जेव्हा फुलून येते तेव्हा, तो सोहळा दोन्ही डोळ्यांच्या कक्षेत मावत नाही. असा हा अप्रतिम आनंद सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी व जीवनाचे कल्याण करून घेण्यासाठी एक तरी पाई वारी करावी, असे संतांनी म्हटले आहे. दर्शनी समाधान हेच खरे सुख आहे… धन्य धन्य ती पंढरी.. धन्य तो विठोबा महाराज..

 

रमेश जे. पाटील

आडगाव ता. चोपडा

९८५०९८६१००

Leave A Reply

Your email address will not be published.