बाबो.. ८ किलोची नागीण चप्पल ! सर्वदूर होतेय चर्चा..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

तुम्ही कधी ८ किलो वजनाची नागीण चप्पल पाहिलीय आहे का ?. या चप्पलची सर्वदूर चर्चा होत आहे. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील जांभुळणी येथे एका मेंढपाळाची ही नागीण चप्पल.. या मेंढपाळाचं नाव केराप्पा कोकरे असून या व्यक्तीचं वय ६० वर्ष इतकं आहे.

केराप्पा हा ६० वर्षाचा व्यक्ती असून तब्बल ८ किलो वजनाची चप्पल अगदी सहज पेलत आहे. त्यामुळे अशा नागीणीचा फणा असलेल्या या चप्पलची सर्वदूर चर्चा होतेय. केराप्पा कोकरे व्यवसायाने मेंढपाळ असून यांचे रोजचे जीवन शेतामध्ये त्यांच्या मेंढ्याबरोबर असते. त्यांच्या रोजच्या वेशभूषेत धोतर, शर्ट आणि पागोटे असा ग्रामीण शैलीचा पेहराव आहे.

या परिसरात होणाऱ्या गजी नृत्यात गजी म्होरक्याची भुमिका ही ८ किलोची चप्पल घालून केराप्पा पार पाडतात. ही नागीण चप्पल त्यांनी अकलूज येथून तयार करून घेतली असून त्याची किंमतही तब्बल ३१ हजार रुपये आहे. केराप्पांच्या या चप्पलमध्ये १०० एल ईडी लाईट्स, गोंडे, १०० घुंगरु, नटबोल्ट, काचेच्या टिकल्या बॅटरी असं सगळं साहित्य वापरण्यात आलं आहे.

केराप्पांना वयाच्या पंधराव्या वर्षापासून अशा चप्पला वापरण्याची आवड आहे. वयाच्या साठाव्या वर्षीही केराप्पा त्यांच्या वेशभूषेमुळे सगळ्यांमध्ये उठून दिसतात. केराप्पा त्यांच्या या खास चप्पलची एखाद्या लहान मुलाप्रमाणे काळजी घेतात. इतकचं नाही तर त्या चप्पलला रोज अत्तर लावून व्यवस्थित पुसुन ठेवण्याचं काम ही ते नियमितपणे पार पाडतात. लग्न समारंभ किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात किंवा गजी नृत्यामध्ये केराप्पा ही चप्पल घालून जातात. या ८ किलोच्या चप्पलमुळे केराप्पा यांना सेलिब्रिटी प्रमाणेच वागणूक मिळत असल्याचं त्यांनी सांगितल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.