बस कंडक्टर महिला हत्या प्रकरण; मैत्रीण व तिच्या पतीने केला घात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नागपूर : बस कंडक्टर महिला हत्या प्रकरण. स्कूल बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेची अज्ञात आरोपीने हत्या केली. हातपाय बांधून प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीत तिचा मृतदेह गुंडाळून निर्जन ठिकाणी फेकून दिला. रविवारी सकाळी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली. तेव्हापासून परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. अखेर या घटनेची उकल झाली आहे.

स्कूल बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या दीपा जुगल दास (४१) नामक महिलेच्या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला. बचत गटाच्या पैशाच्या व्यवहारामुळे दीपाची मैत्रीण आणि तिच्या पतीने हत्या केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी या प्रकरणात सुवर्णा तसेच तिचा पती सामी सोनी या दोघांना अटक केली.

समर्थनगरात राहणारी दीपा जुगल दास (४१) जैन स्कूलच्या बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत होती. तिला एक मुलगा आणि मुलगी असून तिचा पती स्टील कंपनीत काम करतो. दीपा बचत गटाचेही काम करून आर्थिक व्यवहाराचा हिशेबही सांभाळायची. दीपा नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी कर्तव्यावर गेली. दुपारी २ च्या सुमारास तिला बसचालकाने कुशीनगरात उतरवून दिले. तेथून ती सुवर्णाच्या घरी गेली. नंतर बेपत्ता झाली.

रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास कपिलनगरातील एसडीपीएल सोसायटी, उप्पलवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर दीपाचा मृतदेह फ्रीजच्या प्लास्टीकमध्ये गुंडाळून असल्याचे दिसले. ही माहिती कळताच कपिलनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी तपासाची चक्रे फिरवली. लास्ट लोकेशनच्या आधारे सुवर्णाला ताब्यात घेण्यात आले. रात्रीपर्यंत वेगवेगळी माहिती देणारी सुवर्णा अखेर गडबडली अन् तिने पतीच्या मदतीने दीपाची गळा आवळून हत्या केल्याचे कबुल केले.

एक लाखाचा होता व्यवहार

सूत्रांनुसार, दीपाने सुवर्णाला एक लाख रुपये बचत गटातून कर्जाच्या रुपात दिले होते. ते परत करण्यासाठी सुवर्णा अन् तिचा पती टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यावरून त्यांच्यात खटकेही उडत होते.

शनिवारी दुपारी तसेच झाले. पैसे मागण्यासाठी आलेल्या दीपासोबत सुवर्णा आणि तिच्या पतीने वाद सुरू केला. पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमीका दीपाने घेतल्याने त्यांच्यात बाचाबाची आणि नंतर हाणामारी झाली.

दीपा आरडाओरड करीत असल्याने सुवर्णा अन् तिच्या पतीने रागाच्या भरात तिच्या गळ्याभोवती ओढणीचा गळफास ओढला अन् तिला ठार मारले. नंतर रात्रीच्या वेळी प्लास्टीकमध्ये तो गुंडाळला. नंतर फ्रीजच्या खरड्याच्या बॉक्समध्ये मृतदेह भरून तो ई रिषात भरून उप्पलवाडीत नेऊन फेकला.

Leave A Reply

Your email address will not be published.