जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
सध्या सर्वत्र नवीन वर्षाची धामधुमीची तयारी सुरु आहे. त्यामुळे अनेक शौकिनांची त्यासाठी कसरत दिसून येत आहे. मग ती पार्टी साठीची प्लानिंग असो कि, इतर काही. मात्र दुसरीकडे प्रशासन कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये व अवैधरीत्या कुठलाही प्रकार बाजारात चालू नये त्यासाठी कमालीचे कारवाई करतांना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात धाडी टाकण्याचे सत्र सुरु केले. यावेळी धाडींमध्ये तब्बल सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून १४ जणांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
३१ डिसेंबरनिमित्त बनावटसह अवैधपणे मोठ्या प्रमाणावर दारुची विक्री होते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सतर्कता दाखवित शुक्रवारी दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत कारवाई सत्र राबविले. त्यात पाचोरा, चोपडा, जळगाव परिसरातून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दारुसह ताडीचे ‘पाऊच’ही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले आहेत. अवैधपणे हा साठा विक्री करणाऱ्या १४ जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटकही केली आहे. एका कारने ताडीने भरलेले ‘पाऊच’ वाहून नेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून १०० पाऊचसह वाहन जप्त करण्यात आले आहे.
जळगाव, पाचोरा, चोपडा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी एरंडोल तालुक्यातील अवैध मद्यविक्री करणाऱ्या व विनापरवाना दारूच्या दारु पिणाऱ्या १७ आरोपींवर दारुबंदी कायद्यानुसार कारवाई केली. १२ मदयपींना ४ गुन्हयांमध्ये एरंडोल येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी 300 रुपयांचा दंड ठोठावला. त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी शुक्रवारी रात्री महामार्गावर वाहनांची अचानक तपासणी सुरु केली. रात्रभरात कुठेही दारुची तस्करी करणारे वाहन आढळून आलेले नाही.
दरम्यान, तरसोद शिवारातील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन करणाऱ्या ४ जणांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रोहित राजेंद्र चव्हाण, नवल अजयपाल जाधव, अक्षय संजय चव्हाण, प्रशांत दत्तू पाटील (जळगाव) अशी चौघांची नावे आहेत.