दहावी बारावी परीक्षेसाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान

0

लोकशाही संपादकीय लेख

मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी पासून महाराष्ट्रात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. त्यानंतर दहावीची परीक्षा होणार आहे. गेले दोन वर्ष कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनातर्फे कॉपीमुक्त परीक्षेचे अभियान राबवण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी यांनी शिक्षण संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांची एक बैठक घेऊन दहावी बारावीच्या परीक्षेत कॉपी होणार नाही, यासंदर्भात योग्य दखल घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी मित्तल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांची बैठक घेऊन कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात संदर्भात चर्चा केली. जळगाव जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ७६ केंद्रांवर परीक्षा दिली जाणार आहे. एकूण ४७ हजार ३७० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १३८ परीक्षा केंद्र दिले असून जिल्हाभरात एकूण ५६ हजार १६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

कोरोना नंतरच्या काळात पहिल्यांदा परीक्षा होणार असल्याने कॉफीचे प्रमाण वाढेल, हे लक्षात घेऊन परीक्षेत कॉपी होणार नाही या संदर्भात कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेचे पाऊल उचलल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन करायला हवे. परीक्षेत कॉपी करताना सापडणाऱ्या विद्यार्थ्यांवर, कॉपी पुरवणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी स्वतः जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक या तिघांची मुख्य भूमिका राहील. जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः ज्या ठिकाणी कॉपी होत आहे, अशी माहिती मिळताच तेथे पोहोचतील आणि योग्य ती कारवाई करतील. प्रत्येक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोलिसांचे पथक राहील आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी होमगार्डची मदत घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या ५० मीटर परिसरात कोणतीही अनधिकृत व्यक्ती प्रवेश करू शकणार नाही. या परिसरात संशयी व्यक्ती दिसली तर त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. त्यामुळे बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी होणाऱ्या प्रकारावर आपोआप बंधन येणार आहे. ज्या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर कॉपी होत आहे, असे निदर्शनात आले तर तेथील मुख्याध्यापकावर तसेच संस्थाचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या केंद्राचा निकाल चांगला लागावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या संचालक व मुख्याध्यापकांवर आपोआप बंधन येणार आहे. परिणामी आपल्या संस्थेचा व्यवसाय करून पाहणाऱ्या संस्थाचालकांवर आपोआप रोख लागणार आहे. ही बाब वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पूर्णपणे झडती घेऊन त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.

कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवले जाईल अशी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली भूमिका महत्त्वाची असून त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. जळगाव जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांवर तीन भाग करण्यात आले आहेत. त्या अतिसंवेदनशील केंद्र, संवेदनशील केंद्र आणि सर्वसाधारण केंद्र यांचा समावेश आहे. अति संवेदनशील केंद्र विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी मिळावे म्हणून मोठे प्रयत्न केले जातात. येथे देखील संस्थाचालकांचा हातभार असतो. अशा परीक्षा केंद्रांवर नियंत्रणासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस पथक वगैरेंना हे संस्थाचालक खिशात ठेवतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे अशा अतिसंवेदनशील केंद्रांकडे खास करून विशेषतः लक्ष दिले जाणार आहे. त्यानंतर संवेदनशील केंद्रांकडे कॉपीमुक्त अभियानांतर्गत अशाच प्रकारे खास लक्ष देऊन तेथे कॉपीमुक्त परीक्षा होण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. अशा केंद्रांवरील संस्थाचालकांची तसेच दहशत माजवणाऱ्यांची दादागिरी संपुष्टात आणावी लागणार आहे. कॉपीमुक्त अभियानाचा फक्त गाजावाजा व्हायला नको. कारण अनेक वेळा ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ असे प्रकार आढळून आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करावा आणि परीक्षा द्यावी हाच हेतू या कॉपीमुक्त परीक्षा अभियानामागे आहे. फक्त अंमलबजावणी करताना कसलाही दुजाभाव न करता ती केली तरच कॉपीमुक्त परीक्षा अभियान यशस्वी झाले असे म्हणता येईल…!

Leave A Reply

Your email address will not be published.