विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पोलीस पतीला अटक; ४ जणांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रामेश्वर कॉलनी येथील २३ वर्षीय विवाहितेने पोलीस पतीकडून हुंड्यामुळे वारंवार होत असलेल्या छळाला  कंटाळून गुरूवारी ९ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. विवाहितेच्या वडीलांच्या फिर्यादीवरून पतीसह चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. यात पोलीस पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रविण श्यामराव पाटील रा. श्रीराम मंदीर चौक मेहरूण यांची लहान मुलगी कोमल हिचा विवाह १३ फेब्रुवारी २०१६ रोजी रामेश्वर कॉलनीतील चेतन अरविंद ढाकणे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. चेतन ढाकणे हा भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. लग्नाच्यावेळी हुंडा म्हणून २० लाख रूपये देण्याचे ठरले होते. परंतू लग्न थाटामाटात झाल्याने प्रविण पाटील यांनी ७ लाख रूपये दिले. उर्वरित १३ लाख रूपयांपैकी १० लाख रूपये चार महिन्यांपूर्वी घर घेण्यासाठी  दिले होते. हुंड्यातील ३ लाख रूपये देणे बाकी होते. दरम्यान, उर्वरित हुंड्यातील ३ लाख रूपये आणावे यासाठी पती चेतन ढाकणे याने विवाहितेला मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ करत होता. हुंड्याची रक्कम तातडीने आणावी यासाठी सासू मंदाबाई अरविंद ढाकणे, नणंद प्रतिभा ज्ञानेश्वर घुगे आणि जवाई ज्ञानेश्वर विठ्ठल घुगे यांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

विवाहिता कोमल हिने  या छळाला कंटाळून ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मुलीने आत्महत्या केल्याचे कळताच विवाहिता कोमलचे आई वडीलांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. यात सासरच्या जांचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली असल्याचा आरोप कोमलचे वडील प्रविण पाटील यांनी केला. वडील प्रविण पाटील यांच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळीविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी पती चेतन ढाकणे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.