राज्यात जोरदार पावसाचा इशारा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यंदाचे नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यानंतर महाराष्ट्रासह देशात बहुतांशी ठिकाणी पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे. दरम्यान दक्षिण आणि ईशान्य भारतात मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला आहे.

मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण होतं आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान खात्याने 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1454386992058306561?s=20

खरंतर, सध्या श्रीलंका आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र  निर्माण झालं आहे. पुढील तीन ते चार दिवसांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम दिशेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी येत्या आठवड्यात पावसाची स्थिती आहे. तामिळनाडू आणि आसपासच्या परिसरात तर पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने उघडीप घेतल्यानंतर, आता पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे.

श्रीलंका आणि कर्नाटक राज्याच्या किनारपट्टी परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम दिशेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विकेंडनंतर राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने सोमवारी (1 नोव्हेंबर) सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात सोमवारी मेघरगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मंगळवारी राज्यात हवामानाची स्थिती कायम राहणार असून अन्य भागात देखील तुरळक पावसाची शक्यता आहे. बुधवारी मात्र हवामान खात्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. दरम्यान पुणे, रायगड, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.