येऊरच्या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  

येऊरच्या ठाणे पालिका शाळेत आदिवासी पाड्यावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुद्ध पाणी मिळणार आहे. दिशा ग्रुपच्या माध्यमातून या शाळेतील प्रत्येक मजल्यावर अक्वागार्ड बसवण्यात आले असून नवीन वर्षाची ही भेट मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. विशेष म्हणजे, आता शाळेतच शुद्ध पाणी मिळणार असल्याने या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे ओझेही कमी होणार असल्याने हा भारही आता कमी होणार आहे.

कोरोना काळात तब्बल दीड वर्षे बंद असलेल्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या. शाळेत विद्यार्थ्यांची लगबग सुरु झालेली असतानाच त्यांच्या आरोग्यविषयक दैनंदिन सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी हा मूलभूत प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांची हीच गरज ओळखून दिशा ग्रुपचे संस्थापक भास्कर बैरीशेट्टी व स्थानिक शिवसेना नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांच्या संकल्पनेतून येऊर येथील पालिका शाळा क्रमांक ९ मध्ये अक्वागार्ड बसवण्यात आले. आधीच येऊरच्या अनेक आदिवासी पाड्यांवर शुद्ध पाण्याची मोठी वानवा असल्याने भास्कर बैरीशेट्टी यांनी नव्या वर्षाच्या सुरवातीलाच या शाळेच्या तिन्ही मजल्यावर प्रत्येकी एक अक्वागार्ड मशीन बसवून विद्यार्थी व शिक्षकांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुखद धक्का दिला.

याआधी बैरीशेट्टी यांनी वर्तकनगर येथील थिराणी शाळेतही अशाच पद्धतीने अक्वागार्ड मशीन बसवले होते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे ओझे कमी करण्यासाठी तसेच त्यांना शुद्ध पाणी शाळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने शाळांमध्ये अक्वागार्ड बसवण्यात आल्याचे बैरीशेट्टी यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी, शिवसेनेच्या विभागीय संघटक वैशाली शिंदे, महिला शाखा संघटक पूजा हिंदोळे, समाजसेविका खिल्लारे, शाळेतील शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

वायफायही बसवणार 

विद्यार्थ्यांच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता येऊरच्या या शाळेत विनामूल्य वायफाय सेवा दिशा ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे भास्कर बैरीशेट्टी यांनी सांगितले. भविष्यात ऑनलाईन शिक्षण, प्रोजेक्टर वापर तसेच इतर डिजिटल अध्यापनासाठी या वायफाय सेवेची आवश्यकता असल्याची माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली. त्यानुसार ही सेवा देखील लवकरच सुरु करून दिली जाईल, असेही बैरीशेट्टी यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.