अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना लढावेच लागेल: डाॅ. जितेंद्र आव्हाड

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने लढायला हवे होते. पण, त्यावेळेस मैदानात दलित वर्ग उतरला होता. ओबीसी मात्र मागे होते. कारण, त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे. पण, आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना मैदानात उतरावेच लागेल, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.

ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी डॉ.  जितेंद्र आव्हाड बोलत होते. या प्रसंगी आ. रवींद्र फाटक, आ. निरंजन डावखरे, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते तथा ओबीसी नेतृत्व अशोक वैती, परिवहन सभापती विलास जोशी,मा. खा. आनंद परांजपे, नगरसेवक मनोहर डुंबरे, दिलीप बारटक्के, भुषण भोईर, संदीप लेले, उषा भोईर, मालती पाटील, कविता पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, नंदा पाटील, अॅड अनिता गौरी, कमल चौधरी, पुजा वाघ यांच्यासह ठामपाचे अनेक नगरसेवक,  नगरसेविका आदी उपस्थित होते. राजाभाऊ गवारी, मंगेश आवळे, रवी कोळी, समुखराव, राजु सत्यम, सिद्धू यादव, समिषा मार्कंडे,नयना भोईर, अरूंधती डोमाळे, मेघनाथ घरत, नितीन लांडगे,  नितीन पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ.  आव्हाड म्हणाले , जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले जर नसते तर आज इथे कोणतीच महिला दिसली नसती. महिला कोणत्याही जातीधर्माची असली तरी ती सुशिक्षित झाली त्याचे श्रेय फक्त आणि फक्त सावित्रीमाई यांनाच जाते. कार्ल मार्क्स याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते जोतिराव फुलेच आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा ओबीसींसाठीच दिला आहे, याची जाणीव तमाम ओबीसींनी ठेवले पाहिजेत. आज ओबीसींचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न होत आहे. पण, हे आरक्षण संपवणार्या केंद्राविरोधात ओबीसी आक्रमक होत नाहीत. आता लढण्याची वेळ आली आहे. पांगळे होऊ नका, लढा, असे आवाहनही त्यांनी यावेळेस केले.

आ. निरंजन डावखरे यांनी,  ओबीसी एकवटू लागले आहेत,  हे अत्यंत चांगले आहे. पण, राज्याने इम्पिरिकल डाटा सादर करून ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन केले. तर, ओबीसी नेतृत्व अशोक वैती यांनी , एका कार्यक्रमापुरते मर्यादित राहू नये, ठाणे ओबीसी एकीकरण समितीने यापुढेही नियमित एकत्र येणे गरजेचे आहे. जर आपण एकत्र आलो तरच ओबीसींची बिगर राजकीय ताकद उभी राहिल, असे सांगितले. प्रफुल वाघोले यांनी, ठाण्यात ज्या पद्धतीने कार्यक्रम राबविला आहे. त्याचपद्धतीने राज्यभर असे कार्यक्रम राबविले पाहिजेत, असे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संजय भालेराव यांनी कार्यक्रमामागील भूमिका मांडली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते  मिनल पालांडे ,  डाॅ. अर्चना पवार, प्रा. नलिनी कुडूक, आरती प्रधान, श्रृतीका महाडीक, शितल खरटमल, वर्षा मटकर,  जयश्री रामाणे, प्रज्ञा गायकवाड,  संगीता बामणे, विमल तांबे, कन्या खानविलकर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रफुल वाघोले , सचिन शिंदे, राहुल पिंगळे, सचिन केदारी, कृष्णा भुजबळ, संजय भालेराव, अमित पाटील, सचिन देशमाने, यतिन पवार, गणेश कुरकुंडे, जितेंद्र यादव, प्रकाश निषाद, शिवप्रसाद यादव, रामाश्रय यादव, राज राजापूरकर, राजेंद्र देसाई, अजय जाधव, निलेश हातणकर यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.