म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरण; ६ आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर येताच, या विभागाचे मंत्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री उशिरा परीक्षा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली.

तर, या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला सहा आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्या प्रकरणी औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे या भागात आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. त्यामध्ये औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ, डॉ. प्रितीश देशमुख या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्या आरोपींकडे काही पेपर, पेन ड्राईव्ह आदी साहित्य आढळून आले आहेत.

तसेच, काहींचे मोबाइल नंबर देखील मिळाले आहेत. या कारवाईमधून आणखी नावे समोर येण्याची शक्यता असल्याने आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.