मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महाड दौरा; तळीये गावाची करणार पाहणी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अतिमुसळधार पावसाने  महाड येथील पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथक बचावकार्य करीत आहे.

दरम्यान, महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 40 लोक ठार झाले आहेत. दरडीखाली अख्खं गावच नेस्तानाबूत झाले असून त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करणार आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जवळपास 36 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही नागरिक अडकले असून बचावकार्य सुरू आहे. हा आकडा वाढण्याची भीती आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सततच्या पावसामुळं सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यात सर्वात मोठी दुर्घटना ही तळीये गावात घडली असून या घटनेने हाहाकार माजला आहे.

काल रात्रीच्या सुमारास ही दरड कोसळल्याची माहिती आहे. मात्र हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. मात्र काही वेळापूर्वी एनडीआरएफची टीम ज्यावेळी इथं पोहोचली त्यावेळी ही भयंकर घटना समोर आली. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. गेल्या काही तासांपासून इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनची टीम देखील या ठिकाणी काम करत आहे. घटनेनंतर या गावालगतच्या सर्व वाड्यांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.