महिलांच्या फोटोत अश्लिलता निर्माण करून तरुणाला पैशांची मागणी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील एका तरुणाच्या पत्नी व आईच्या फेसबुकवरील फोटोत एका विकृताने फेरबदल करुन त्यात अश्लिलता निर्माण केली. ते फोटो एका वेबसाईटवर अपलोड करुन व्हायरल करण्याची धमकी त्याला दिली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्टेशनला  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेतील तरुणाचे फेसबुकवर अकाऊंट आहे. काही दिवसांपुर्वी या तरुणाने त्याच्यासोबत त्याच्या पत्नी व आईचे फोटो त्याच्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केले होते. एका विकृताने ते फोटो डाऊनलोड करुन त्यात छेडखानी करत त्यात अश्लिलता निर्माण केली. ते अश्लिल व बनावट फोटो त्या तरुणाच्या मोबाइलवरील व्हाटस अ‍ॅप क्रमांकावर त्याने पाठवले. या बाबत माहिती देण्यासाठी त्या विकृताने सदर तरुणाला 2 सप्टेबर रोजी फोन केला. मात्र कामाच्या गडबडीत त्याने तो फोन उचलला नाही.

नंतर काही वेळाने त्या तरुणाने त्याचे व्हाटस अ‍ॅप तपासले असता, त्यात त्याला त्याच मोबाईल क्रमांकावरुन आलेला त्याच्या पत्नी व आईचा छेडखानी केलेला बनावट अश्लील फोटो दिसला. तो फोटो बघून त्या तरुणाला धक्काच बसला. त्या फोटो सोबत एक हजार रुपयांची मागणी करण्यात आलेला मजकूर लिहून आला होता. त्याच मोबाईल क्रमांकावरुन त्या तरुणाला पुन्हा फोन आला.

हिंदीत बोलणा-या त्या इसमाने त्याला धमकी दिली की या क्रमांकावर फोन पे च्या माध्यमातून एक हजार रुपये पाठव अन्यथा तुझ्या पत्नी व आईचे फोटो व्हायरल केले जातील. फोनवर मिळालेली धमकी ऐकून सदर तरुण घाबरला. त्याच्या मोबाईलमधे फोन पे अ‍ॅप नसल्यामुळे त्याने चुलत भावाला सर्व प्रकार कथन करुन त्याच्या फोन पे अ‍ॅपच्या मदतीने त्या विकृताला एक हजार रुपये पाठवले. त्यानंतर भेदरलेल्या त्या तरुणाने धमकीचा येणारा फोन क्रमांक ब्लॉक करत आलेले अश्लिल फोटो डिलीट केले.

दिलेल्या धमकीचा परिणाम होऊन एक हजार रुपये मिळाल्यानंतर धमकी देणारा विकृत सरावला. त्याने विविध चार क्रमांकावरुन सतत फोन करुन तीन  हजार रुपयांची मागणी करत तरुणाला हैरान करुन सोडले. आता आपल्याकडे पैसे नाही असे सांगत त्रस्त तरुणाने त्या विकृतास पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या तरुणाला अश्लिल फोटो, अश्लिल मजकुर आणि एक सोबत एक लिंक पाठवली. त्या लिंक वर क्लिक केले असता त्याला त्याच्या पत्नीचे वेबसाईटवर अपलोड केलेले अश्लील फोटो दिसून आले. त्या फोटोच्या खाली एक मजकूर लिहिलेला होता.

त्यानंतर पुन्हा आलेल्या मोबाईल क्रमांकावरुन सदर त्रस्त तरुणाला तीन  हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसेच नसल्यामुळे त्रस्त तरुणाने त्याला पाठवले नाही. पैशांची लालसा लागलेल्या  त्या  इसमाने ते फोटो व्हायरल करण्याची पुन्हा धमकी दिली. अखेर त्या त्रस्त तरुणाने सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांची भेट घेत आपली व्यथा कथन केली. दिपक कुमार गुप्ता यांनी पोलिस दलासोबत पाठपुरावा करुन त्या तरुणाची फिर्याद सायबर पोलिस स्टेशनला दाखल करुन घेतली. 2 ते 8 सप्टेबर दरम्यान घडलेल्या या प्रकरणाचा सायबर पोलिस तपास करत आहेत.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.