भाजपच्या बंदला हिंसक वळण; आंदोलकांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या महिन्यात त्रिपुरातील हिंसाचाराचा वणवा आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. आजही राज्यात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. अमरावती, नांदेड आणि नाशिक या तीनही शहारांमध्ये वातावरण चिघळं आहे.  भाजपने अमरावतीत बंदचे आवाहन केल्यानंतर आज पाळण्यात येत असलेल्या बंदला हिंसक वळण लागले आहे. आक्रमक आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला.

मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त अमरावतीत बंदच्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आला होता. चौकाचौकात राज्य राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आले. पण, असे असतानाही समोर आलेल्या दृष्यांनुसार आंदोलक बंद दुकानांची कुलुपे तोडून तोडफोड करत असल्याचेही दिसत आहे. तसेच दुकानांबाहेरील साहित्याचेही नुकसान केले जात आहे. त्यामुळे आक्रमक आंदोलकांसमोर पोलीस यंत्रणा तोकडी पडत असल्याचे चित्र आहे. नागपूरचे पोलीस महासंचालक संदीप पाटील हे अमरावतीत दाखल झाले असून या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

त्रिपुरा राज्यात झालेल्या अत्याचारा विरोधात अमरावतीत 12 नोव्हेंबर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ते 20 हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. पण या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील 20 ते 22 दुकानात तोडफोड झाली. काही दुकानदारांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला. भाजपने या मोर्चा विरोधात अमरावती शहर बंदचे आवाहन केले. पण, या बंद दरम्यान आंदोलकांनी हिंसा केली.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. सामान्य जनतेला कोणीही वेठीस धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन अमरावतीच्या पालकमंत्री व महिला, बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. पूर्णपणे परिस्थितीवर राज्य सरकार नियंत्रण ठेवून आहे. तसेच गृहमंत्री स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे सर्व हिंदू व मुस्लीम बांधवांना कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

जे कोणी यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले असून या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी जनतेला केली आहे. गृहमंत्र्यांनी पोलिस बांधवांनाही परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.