बुरशीयुक्त शेवयांना भ्रष्टाचाराची उकळी! भाग-१६

0

अधिकार्‍यांची चौकशी करावी : ठोस कारवाई नाहीच!

जळगाव, दि. 25 –
जिल्हा परिषदेमधील अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात आलेल्या बुरशीयुक्त शेवयांना भ्रष्टाचाराची उकळी फुटली असताना देखील या प्रकरणी सखोल चौकशी होत नसल्याने अधिकार्‍यांचे मोठे गोडबंगाल असून त्यांची चौकशी करावी अशी मागणी होत असताना देखील त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरु असून अद्यापपर्यंत कुठल्याही कारवाईला जिल्हा परिषद प्रशासनाने सुरुवात केली नसल्याने शंका निर्माण झाली आहे.

त्रयस्त स्तरावरुन व्हावी चौकशी
या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासन बचावाची भूमिका निभावत असून येथील काही अधिकार्‍यांचा प्रत्यक्ष तर काहींचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याने त्यांना पाठीशी घातले जात असून या प्रकरणाची त्रयस्त स्तरावरुन चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील अंगणवाडीत बुरशीयुक्त शेवयांचा पुरवठा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतरही प्रशासनाने केवळ रँडम पद्धतीच्या चौकशीचा फार्स आवळला असला तरी पुढे कारवाईचे सत्र सरकत नसल्याने शंका निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील पंधरा अंगणवाड्यांचे रँडम पद्धतीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरही यावर कारवाई करण्यास प्रशासनाला मुहूर्तच गवसला नसल्याने नानाविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. जिल्हा परिषद सदस्या रेखा राजपूत यांनी या संपूर्ण प्रकरणाची पुराव्यानिशी तक्रार करुनही त्यांच्या तक्रारीला अधिकार्‍यांनी केराची टोपली दाखविली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून या प्रकरणाची तक्रार करुनही कुठलीही ठोस कारवाई झाली नसल्याने याचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शंका उपस्थित झाली आहे. या प्रकरणात ज्या अधिकार्‍यांनी चौकशी करणे क्रमप्राप्त असताना देखील ते अधिकारी तोंडावर बोट ठेवून आहेत. यात अधिकार्‍यांचीच चौकशी करणे आवश्यक झाले असून त्यांचे हात बरबटल्याची चर्चा होत आहे. धुळे येथील ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न करण्यातच अधिकारी गुंग झाल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.