रेल्वेस्थानक लगतच्या रस्त्यावर  पार्किंगच्या नावाखाली ‘दबंगगिरी  ‘!

0
– टारगट तरुणांकडून पार्किंग  फी वसुलीसाठी शिवीगाळ
– खान्देश सेंट्रल मॉलच्या आवारातुन जाणाऱ्या वाहनधारकांची अडवणूक 
– खासगी सुप्रसिद्ध कायदेतज्ञांसहित अनेकांना आला वाईट अनुभव
– दिला कायदेशीर कारवाईचा इशारा 
जळगाव;
जळगाव रेल्वेस्थानक आणि खान्देश सेंट्रल हे सतत काहींना काही घटना घडामोडींनी कायम चर्चेत असणारी ठिकाणे आहेत . हाणामारी ते छेडछाडीपर्यंतच्या अनेक घटना या ठिकाणी घडत असल्याचा अनुभव जळगावकरांना आधीच आला असून आता मात्र खान्देश सेंट्रल मॉलमधून गेलेल्या मनपाच्या रस्त्यावरही वाहन उभे राहिल्यास काही टारगट तरुणांच्या टोळक्यांकडून जबरसदस्तीने वाहनचालकांकडून पार्किंगची पावती फाडण्याचा आग्रह होऊन प्रसंगी शिवीगाळ करून पैसे वसुलीचा गोरख धंदा येथे सुरु असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे . मात्र सुप्रसिद्ध कायदेतज्ञ् सुशील अत्रे यांनाही हा वाईट अनुभव आला असून त्यांना काही तरुणांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार येथे घडल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास येथे घडली . यावेळी बोलतांना श्री . अत्रे यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा देऊन रस्त्यावर वाहन उभे असताना व पार्किंगचा प्रश्नच नसताना वसुलीसाठी प्रसंगी शिवीगाळ करणारे टारगट तरुण कसे काय सामान्य व्यक्तींकडून पार्किंगचे पैसे वसूल करू शकतात असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला . सोशल मीडियावरही त्यांनी आपले अनुभव नमूद केले आहे  . त्याला जळगावकरांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे .
नागरिकांच्या सोयीसाठी केला रस्ता 
मनपा ,रेल्वे प्रशासन आणि खान्देश सेंट्रल मॉल यांनी मिळून रेल्वे स्थानकात येणाऱ्या -जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची सातत्याने कोंडी होत असल्याने  रेल्वे स्टेशन कडून सेंट्रल मॉलकडे जाणारा रस्ता १५ ऑगस्ट २०१७ ला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यावेळी तत्कालीन  महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,मान्यवर उपस्थित होते.
जळगाव रेल्वे स्टेशनजवळ होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रेल्वे विभागाशी चर्चा करून त्यांनी बांधलेली मॉलच्या बाजूची भिंत काढून टाकण्याच्या सूचना केल्या होत्या. स्टेशनकडून मॉलकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला . सेंट्रल मॉलच्या बाजूने रेल्वे विभागाची १२ मीटर भिंत यासाठी   तोडण्यात आली.
वाहतूक कोंडी सुटली ; मात्र डोकेदुखी कायम 
या रस्त्यामुळे रेल्वे स्टेशनजवळील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत झाली असली तरी वाहनधारकांकडून थोड्या वेळासाठी  रस्त्यावरही उभे असल्यास पार्किंग फी वसूल केल्याचा प्रकार अनेकांना आला असून गुरुवारी सुशील अत्रे हे सेवाग्राम एक्स्प्रेसने १० वाजेच्या सुमारास रेल्वेस्थानकावर आले . त्यांना घेण्यासाठी मुलाने चारचाकी सेंट्रल मॉलच्या रस्त्याने रेल्वेस्टेशन जवळ आणली. त्याने कार पे अँड पार्कच्या बॅनरजवळील दुभाजकाला टर्न मारून थांबविली . थोड्याच वेळात  तेथून श्री . अत्रे हे वाहनात बसत नाहीत तोच तीन चार तरुणांनी वाहनाकडे धाव घेत पार्किंगचे पैसे देण्याची मागणी करून अत्रे यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली . मात्र अत्रे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून तरुणांना रस्त्यावर अवघ्या १५ -२० सेकंदासाठी वाहन उभे असताना पार्किंगचे पैसे का द्यावे ? असा सवाल करून नकार दिला . यावर त्यातील एका तरुणाने शिवीगाळ करून हुज्जत घालत गोंधळ घातला . मात्र याप्रकारानंतर गर्दी झाल्यावर अनेकांनी अत्रे यांना ओळखल्याने त्या तरुणांनीही जागेवरून काढता पाय घेतला . मात्र झाल्या प्रकाराने व्यथित झालेल्या ऍड सुशील अत्रे यांनी स्वस्थ न बसता सोशल मीडियावर झालेल्या घटनेची माहिती विशद केली . त्यामुळे अनेकांनी त्यांना आलेल्या अनुभवाचा निषेध व्यक्त करून पाठिंबा दिला आहे . त्यामुळे याबाबत श्री. अत्रे हे कायदेशीररित्या पुढील पाऊल उचलणार असल्याचे त्यांनी लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीमध्ये  बोलताना सांगितले .
दरम्यान यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. राधेश्याम चौधरी यांनी रेल्वे प्रशासनातील सिनिअर डिसिएम यांच्याशी झालेला संवाद सोशल मीडियावर शेअर केला असता रेल्वे प्रशासनाने याबाबत हात वर केल्याचा प्रयत्न केला आहे .
या घटनेमुळे उपस्थित झालेले प्रश्न 
रेल्वे प्रशासनाची चारचाकी वाहनांसाठी स्वतःची पार्किंग व्यवस्था सर्व रेल्वेस्थानकावर आवश्यक असताना तशी सुविधा का उपलब्ध करून देण्यात आली नाही असा सवाल प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे .
खान्देश सेंट्रल मॉलचा रस्ता कुणाच्या मालकीचा ? , मनपा कि,राजमुद्रा कंपनीचा कि रेल्वेचा ?
खान्देश सेंट्रल मॉलच्या परिसरात असलेल्या पार्किंगचे जागा मालक कोण ?
रस्त्यावर खासगी किंवा मनपाच्या रस्त्यावर पार्किंगच्या नावाखाली पैसे घेणे कितपत उचित ?

Leave A Reply

Your email address will not be published.