बालगंधर्व खुल्या नाट्यगृहासाठी आवश्यक सर्व सुविधा देण्यात येणार- महापौर जयश्री महाजन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील जयकिसनवाडी येथील बालगंधर्व खुल्या नाट्यगृहातील लाकडी रंगमंचाऐवजी मुरूम टाकून रंगमंच तयार करण्याचे काम महापालिकेकडून चुकीच्या पध्दतीने सुरू होते. हे काम नियमानूसार होत नसल्याने नाट्य कलावंतांनी सुरू असलेले काम बंद पाडले होते. यासंदर्भात बुधवारी दुपारी महापौर जयश्री महाजन यांनी बांधकामाच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली.

बालगंधर्व खुले नाट्यगृहाचे दुरूस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. परंतू नाट्यगृहात लाकडी रंगमंच काढून त्याठिकाणी मुरूमचा भराव टाकून रंगमंच तयार करण्याचे काम सुरू होते. हे काम चुकीच्या पध्दतीने होत असल्याने मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी कलावंतानी सुरू असलेले काम बंद केले. त्याठिकाणी लाकडी रंगमंचासाठी त्याखाली साडे तीन ते चार फुटाची पोकळी ठेवण्यात यावी आणि नाट्यगृह तालीम व प्रयोगांसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी नाट्यकलावंतांनी केली.

याबाबत महापालिकेचे आयुक्त सतिष कुळकर्णी यांना निवेदनही देण्यात आले. बुधवारी १ डिसेंबर रोजी महापौर जयश्री महाजन, माजी महापौर रमेश जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा, आयुक्त सतिष कुळकर्णी , ललित कोल्हे, सरिता माळी-कोल्हे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, रंगकर्मी शंभू पाटील, नगरसेवक बंटी जोशी, ॲड. कुणाल पवार यांच्यासह नाट्य कलावंत यांनी बांधकामाच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली.

यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले की, नाट्यकर्मींना ज्या पध्दतीने सभागृह हवा आहे त्या पध्दतीने नाट्यगृहासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींच्या पुर्ततेसाठी सर्व सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी कुशल आर्कीटेक्ट यांच्या सोबत येत्या दोन दिवस बैठक घेवून सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.