बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 70 हजारांची लाच; महिला PSI अटकेत

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर 70 हजार रुपयांची रक्कम स्वीकारणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन पसार झाला.

तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस स्थानकातील महिला पोलिस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी महिलेला अटक केली आहे. हेमा सिद्धराम सोळुंके (वय २८) असं अटक  पोलिस उपनिरीक्षक महिलेचे नाव आहे. लाचेची 70 हजार रुपये रक्कम स्वीकारणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्‍ण देसाई हा एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन फरार झाला.

या प्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या विरुद्ध सांगवी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल आहे. या तक्रार अर्जाची चौकशी आरोपी पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांच्याकडे असून अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली. त्यावरुन तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती.

25 आणि 26 नोव्हेंबरला पडताळणी केली असता आरोपी सोळुंके यांच्या सांगण्यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक देसाई यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 70 हजार रुपये ठरवले. 2 डिसेंबरला आरोपी देसाईंनी लाच स्वीकारली आणि त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यासाठी सापळा पथक पुढे सरसावलं असता, त्यांनी बाईक बेदरकारपणे चालवून लाचेच्या रकमेसह पळ काढला. आरोपी हेमा सोळुंके यांना ताब्यात घेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात गुन्हा नोंद करण्यात आला.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.