बँक निवडणुकीत माघार घेवून भाजपने काय मिळविले ?

0

105 वर्षाची परंपरा असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक पार पडली. 21 संचालकांच्या जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने 21 पैकी 20 जागा जिंकून निर्विवाद सत्ता प्राप्त केली. एका जागेवर भुसावळचे आ. संजय सावकारे यांनी पक्षाच्या आदेश धुडकावून अपक्ष उमेदवारी लढविली आणि ते विजयी झाले. आ. संजय सावकारे भाजपचे आमदार असले तरी वरुन भाजपचे अन्‌ आतून राष्ट्रवादीचे विशेषतः एकनाथराव खडसेंचे समर्थक समजले जातात. त्यामुळे ते भाजपचे आमदार जरी असले तरी त्यांचा कल कुणाकडे आहे हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे एकतर भाजपचे आमदार असतांना पक्षाचा आदेश डावलल्याने भाजपचीच छी-थू झाली हे नाकारता येत नाही. त्याच बरोबर रावेरचे माजी आमदार राष्ट्रवादीचे अरूण पाटील यांनी बँक निवडणूकीत रावेर तालुका विकासो मतदार संघातून अपक्ष उमेदवारी लढविली. त्यांना भाजपने पुरस्कृत करून हात दाखवून अवलक्षण केले. कारण या मतदार संघातील महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन यांनी जाहीर पाठींबा दिला होता.

तिसरे अपक्ष उमेदवार बँकेचे माजी उपाध्यक्ष काँग्रेसचे राजू रघूनाथ पाटील यांनीही पत्रकार परिषद घेवून अरूण पाटलांना पाठिंबा दिला होता. अरूण पाटलांची उमेदवारी बिनविरोध असल्याचे जवळपास निश्चित होते. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी डावपेच रचले भाजपने पुरस्कृत केलेल्या अरूण पाटलांच्या विरोधात पाठिंबा देणाऱ्या जनाबाई महाजन निवडणूक प्रचारात उतरल्याने रंगत आणली. शेवटी अरूण पाटलांचा पराभव झाला. अरूण पाटलांची तर नाचक्की झालीच त्याच बरोबर भाजपनेही नामुष्की ओढवून घेतली. एकदा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पुन्हा अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करणे हे भाजपला शोभणारे नव्हते. महाविकास आघाडीच्या नेत्यांना तेच हवे होते.

भाजपने माघार घेतल्यानंतरही भाजपच्या जि.प.सभापतीने बंडखोरी करून शेतकरी विकास पॅनलमधून निवडणूक लढविली. तेथे त्यांचा दारूण पराभव झाला. त्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पूर्वी सर्वपक्षीय पॅनलची चर्चा होत असतांना भाजपचे गिरीश महाजन यांनी जुळवून घेणे आवश्यक होते. परंतु सर्वपक्षीय पॅनलच्या संदर्भात कोअर कमेटीच्या बैठका झाल्यानंतर गिरीश महाजनांसह एकनाथराव खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणायचे सर्व काही ठिक आहे. एक दोन जागांचा तिढा असून तोही सुटेल. परंतु अखेरच्या क्षणी सर्वपक्षीय पॅनल फिस्कटल्यानंतर गिरीश महाजनांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टिका टिप्पणी सुरु केली. त्यानंतर भाजप स्वतंत्र्यपणे पॅनल करून लढणार अशी घोषणा केली आणि उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी भाजपची शक्ती लक्षात आल्याने निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावरील भाजपसारख्या पक्षाची नामुष्की व्हायला नको म्हणून की काय? महाविकास आघाडीच्या नेत्यांचा निषेध करून निवडणूकीतून भाजप माघार घेत असल्याची घोषणा केली. भाजपची ही घोषणा विरोधकांच्या पथ्यावरच पडली. त्यांचे 11 उमेदवारांच्या विरोधात उमेदवारच नसल्याने त्याच दिवशी ते बिनविरोध निवडून आले.

जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सुरुवातीपासून निवडणूक न लढता खर्च टाळावा अणि शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकीय जोडे बाहेर काढून बँकेत शेतकऱ्यांचे हित साधावे म्हणून सर्वच पक्षीय मंडळी एकत्र आली. परंतु त्याला अखेर छेद गेला. 21 पैकी 11 जागांसाठी निवडणूक झाली. महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या उमेदवारांविरोधात अगदीच कमकुवत उमेदवार असल्याने महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. या निवडणूकीतून भाजपने माघार घेवून काय मिळविले? मापही गेले तूपही गेले असेच भाजपच्या बाबतीत झाले. त्याच बरोबर निवडणूकांची जी व्युहरचना करायला हवी त्यात भाजप नेते गिरीश महाजन कमी पडले. डावपेच आखण्यात त्यांना यश आले नाही. म्हणून बँक ही शेतकऱ्यांची बँक राहिलेली नाही.  ती धनदांडग्याची झाली आहे. तसेच बँकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी यापुढे लढू असे म्हणून निवडणूकीतून माघार घेणे म्हणजे आपण निवडणूक जिंकू शकत नाही म्हणून कितने अच्छे है अंगूर, कितने खट्टे है अंगूर या म्हणी प्रमाणे भाजपची आवस्था झाली. त्यामुळे भाजपला आपली फार मोठी चूक झाली. हे पुढे त्यांना लक्षात येईलच.

विशेष करून भाजपच्या गिरीश महाजनांच्या संदर्भात बोलायचे झाले तर त्यांनी जे पेरले ते उगवले असे म्हणायला हरकत नाही. कारण महानगरपालिका निवडणूकीत भाजपची शिवसेनेबरोबर युती होणार असे सांगून ऐनवेळी युती फिरकल्याचे सांगून भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवून शिवसेनेची विशेषत्वाने माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची फसवणूक केली. परिणाम निर्विवाद भाजपची सत्ता महापालिकेत येवून अडीच वर्षानंतर भाजपमध्ये फाटाफूट होवून मनपाची सत्ता हातून गेली. यामध्ये महाजनांचे कट्टर विरोधक एकनाथराव खडसे – डावपेचात खरे उतरले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ठाकुरकी राहिली एवढे मात्र निश्चित.

Leave A Reply

Your email address will not be published.