परिक्रमा शुभारंभानंतर राजकीय कलगीतुरा सुरू

0

गिरणा खोरे बचाव अभियानांतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी परिक्रमा शुभारंभ सोहळा पार पडला. भाजपचे खा. उन्मेश पाटील यांचा हा उपक्रम स्तुत्य व स्वागतार्ह असला तरी परिक्रमा यशस्वी व्हायचे असेल तर राजकारणविरहित व्यापक स्वरूप प्राप्त होणे आवश्‍यक आहे. जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्या हस्ते कानळदा येथील कण्वाश्रम येथे गिरणाकाठी जलपूजन करून परिक्रमेचा शुभारंभ सोहळा पार पडला अन्‌ दुसऱ्या दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाचा राजकीय कलगीतुरा सुरू झाला.

गिरणा नदीच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी 300 कि.मी.ची परिक्रमा पूर्ण करायची असेल तर गिरणेच्या दोन्ही काठावर वसलेल्या गावातील गावकऱ्यांचा सहभाग वाढवणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर गिरणा नदीच्या पाण्यापासून लाभ घेणारे शेतकरी, गिरणा नदीतील पिण्याचे पाणी मिळणाऱ्या गावातील गावकऱ्यांमध्ये गिरणा बचावची जागृती झाली पाहिजे. त्यासाठी राजकीय अभिनिवेश विसरून नि:पक्षपातीपणे काम केले पाहिजे. परंतु राजकारण विरहित परिक्रमा राहील, तिरंगा झेंड्याखाली परिक्रमेत सहभागी व्हायचे असे म्हणायचे आणि कुंपणच शेत खातंय असा आरोप पालकमंत्र्यांवर करायचे. अशा आरोपाने परिक्रमा राजकारण विरहित राहू शकते का? अशा वक्तव्याने खा.  उन्मेश पाटलांनी भाजपा पक्षाची राजकीय पोळी भाजून घ्यायची हे स्पष्ट दिसून येते त्यामुळे गिरणा बचावासाठी आरोप – प्रत्यारोप करणे टाळले पाहिजे.

कारण पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गिरणा नदीच्या पुलावरून दररोज ये-जा करतात. त्यांना पुलाच्या दोन्ही बाजूला नदीत वाळू भरत असतांनाचे शेकडो ट्रॅक्टर दिसत नाही का? असा आरोप करून कुंपणच शेत खातंय असा आरोप गुलाबराव पाटलांवर करणे खा. उन्मेश पाटलांची अपरिक्वता दिसून येते. कारण 2014 ते 2019 या कालावधीत खुद्द भाजपाचेच गिरीश महाजन जलसंधारण मंत्री होते. काही काळ ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांना गिरणा नदीत वाळू भरतांना ट्रॅक्टर दिसत नव्हते का? त्याच बरोबर गेल्या 27 वर्षापासून जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपचेच खासदार असतांना त्यांना दिसले नाही का? तेव्हा कुंपणच शेत खात होते का? असा प्रति आरोप होणे साहजिक आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बोलायला फटकळ आहेत. त्यांचा हा स्वभाव सर्वांनाच माहिती आहे. खा. उन्मेश पाटलांना गुलाबराव पाटलांचा रोष झालाय. आरोप करण्याव्यतिरिक्त खा. उन्मेश पाटलांना काही येतच नाही. परिक्रमा नदीच्या काठावरून पायी करायला हवी. यांनी पायी परिक्रमा न करता गाड्यात बसून केली. तेही गुलाबराव पाटलांनी बांधलेल्या बंधाऱ्यावरील शेतरस्त्यांनी केले. ज्या कण्वाश्रम येथे परिक्रमा शुभारंभ सोहळा झाला. तेथील हॉल 60 लाख रूपये खर्चून गुलाबरावांनी बांधलेला आहे. खा. उन्मेश  पाटलांनी एका गावामध्ये साधी मुतारी तरी बांधली आहे का? असा प्रति आरोप करून खा. उन्मेश पाटलांचे वाभाडे काढले. तेव्हा आरोप – प्रत्यारोपातच परिक्रमा गाजत असेल तर गिरणा खोरे बचाव अभियानातून जनजागृती होईल का? हा खरा प्रश्‍न आहे. त्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशाप्रकारे परिक्रमासारखे गोंडस नाव देऊन विरोधी पक्षावर आरोप करण्याचे काम केले जाणार असेल तर अशी परिक्रमा यशस्वी होईल का?

खा. उन्मेश पाटील यांनी नववर्षाच्या शुभारंभापासून गिरणा खोरे वाचविण्यासाठी परिक्रमासारखा संकल्प स्तुत्य असला तरी त्याच्या यशस्वीतेसाठी  राजकारण करणे योग्य होणार नाही. राजकारणामुळे एखाद्या चांगल्या योजनेचा बट्याबोळ होऊ शकतो हे संयोजक म्हणून खा. उन्मेश पाटलांनी याची नोंद घेणे आवश्‍यक आहे. गिरणा खोरे बचावसाठी संकल्पीत परिक्रमा पूर्णपणे राजकारण विरहित असावी. राजकारणासाठी आरोप – प्रत्यारोप करण्याचे व्यासपीठ हे नव्हे. या ठिकाणी सर्वांना समाविष्ठ करून गिरणेतील वारेमाप वाळू उपसा थांबविण्यासाठी दृष्टीने प्रयत्न झाला पाहिजे. कारण वाळूचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये सर्व पक्षातील लोकांचा समावेश आहे.

राजकारणाचा फायदा घेऊन वाळू व्यवसाय करणाऱ्यांना वाळू माफीया हा शब्दप्रयोग होऊ लागला. त्यातील काही जणांना तडीपारही करण्यात आले. वाळू माफियांच्या पैशावर राजकीय नेते आपली पोळी भाजून घेतात. याबाबत सर्वच पक्षांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. त्यामुळे राजकारण केले तर परिक्रमेवर त्याचा परिणाम होईल. या योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी केलेल्या महत्वपूर्ण वक्तव्याचा प्रत्येकाने आत्मपरिक्षण करावे. माणसांमध्ये जिवंत राहण्यासाठी जसे फुफ्फुसे असतात तसेच नदीचे पाणी वाचविण्यासाठी वाळू हे त्या नदीचे फुफ्फुसे आहेत म्हणून वाळू वाचविणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा विचाराने प्रेरित होऊन परिक्रमा केली गेली तर आपला हेतू साध्य होईल अन्यथा तो हेतू साध्य होणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.