नांदगाव पेठ येथे सार्वजनिक वाचनालयातर्फे कवी संमेलन संपन्न

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमरावती नजीकच्या नांदगाव पेठ येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दोन दिवसीय ग्रंथालय संघाचे अधिवेशन व पुस्तक प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. पहिल्या दिवसाच्या समारोपीय सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे नामवंत कवी विष्णू सोळंके यांनी भूषविले होते. नांदगाव पेठचे नवोदित कवी या कविसंमेलनात सहभागी झाले होते. सर्वश्री दिनकर सुंदरकर, संजय इंगळे, आकाश इटनकर, सागर खेकरे, तुषार राऊत, स्वप्नील नागापुरे या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

अध्यक्षीय भाषणात कवी विष्णू सोळंके यांनी प्रेम हाच कवितेचा एकमेव विषय होऊ शकत नाही. कुठल्याही विषयावर कविता होऊ शकते, आशय महत्त्वाचा असून केवळ यंमकपूर्ती किंवा शब्दांचा खेळ म्हणजेच कविता नव्हे, कविता सर्वसामान्य माणसाचे सुख व दुःख मांडत असते. बेकारी, दरिद्र, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला, पुरुष आणि निसर्ग समाजात वेळोवेळी घडणाऱ्या घटना अशा अनेक सामाजिक बांधिलकीचे प्रश्न कवीने आपल्या कवितेतून व्यक्त केले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी कवी विष्णू सोळंके यांनी केले. संतांचे अभंग ग्रंथ आणि थोर पुरुषांच्या कविता पोवाडे यामुळेच जिवंत असल्याचे प्रतिपादनही कवी विष्णू सोळंके यांनी केले.

कार्यक्रमाला माजी सैनिक संतोष शेंदरकर, आदर्श शिक्षक संदिप अकोलकर, रक्तपेढीचे गजानन इंगळे, तेली समाजाचे अध्यक्ष किशोर साखरवाडे, बजरंग दलाचे विभाग संयोजक संतोष सिंह गहरवार, अमोल व्यवहारे, आदी मान्यवर उपस्थित होते. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन राजन देशमुख यांनी केले तर वंदे मातरमच्या गजरात या कवी संमेलनाचा समारोप झाला. यावेळी नांदगाव पेठ येथील काव्यप्रेमी नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.