दोषींवर होणार कठोर कारवाई! भाग २०

0

बुरशीयुक्त शेवया प्रकरण : मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेकर यांची माहिती

जळगाव, दि. 31 –
जिल्ह्यातल अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात आलेल्या बुरशीयुक्त शेवया प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवड समितीचे सचिव शिवाजी दिवेकर यांनी आज दै. लोकशाहीशी बोलताना दिली.
पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील अंगणवाडीत पुरवठा करण्यात आलेल्या बुरशीयुक्त शेवयांनी जिल्ह्यात खळबळ उघविली होती. या प्रकरणी ठेकेदार, संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या रेखा राजपूत यांनी लावून धरली होती. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात रँडम पद्धतीच्या चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल संबंधित शाखेला प्राप्त झाला असून यावर लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर म्हणाले की, संबंधीत तालुक्यांच्या रँडम चौकशीचे अहवाल प्राप्त झाले असून त्या अहवालाचा अभ्यास करुन संबंधीतांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असून दोषींनी शासन करण्यात येईल. ज्या अधिकार्‍यांनी या प्रकरणी दुर्लक्ष केले आहे त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

दोन महिन्यानंतर कारवाईचा इशारा
गेल्या दोन महिन्यांपादून हे प्रकरण तापत असताना याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले होते. या प्रकरणाची सविस्तर मालिका दै. लोकशाहीने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने आता कारवाई करण्याच्या हालचाली गतीमान केल्या आहेत. तब्बल दोन महिन्यांनंतर कारवाईच्या हालचाली सुरु झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.