‘त्या’ बैठकीवर शेलारांचा आक्षेप; सेनेला केले अनेक सवाल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी मंत्री आदित्य ठाकरेंची  भेट घेतली. यावेळी संजय राऊत देखील उपस्थित होते. मात्र या बैठकीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. बंददाराआड झालेली चर्चा गुप्त का ठेवण्यात आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

”ममता दीदी महाराष्ट्रात आल्या आहेत. सरकार आणि सरकारी पक्ष त्यांचे जोरदार स्वागत करतोय. पाहुण्यांचे स्वागत करणे ही महाराष्ट्राची परंपराच आहे. त्याबद्दल आक्षेप घ्यावा असे काही नाही. पण, मंगळवारी ममता बॅनर्जी आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीबाबत आम्हाला आक्षेप आहे. बंगालमध्ये विरोधकांचं नामोहरण करण्यासाठी गळ चिरले जातात. तसेच धडे काल गिरविण्यात आले का? बंगालप्रमाणेच महाराष्ट्रात कट घडविण्याचा विचार आहे का? या बैठकीमध्ये नक्कीच महाराष्ट्रविरोधात कटकारस्थान रचण्यात आलं अशी आमची शंका आहे. बांगलादेशी लोकांसोबत शिवसेनेचं नेमकं नातं काय?” असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

”ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील उद्योजकांसोबत देखील चर्चा करत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील उद्योगांना, पश्चिम बंगालमधे या असे आमंत्रण घेऊन त्या आल्या आहेत का? म्हणजे इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास ममता दीदींना शिवसेना मदत करतेय का? इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का?” असे अनेक सवाल शेलार यांनी उपस्थित केले.

”महाराष्ट्रात नुकतीच बांग्लादेशीयांवर कारवाई झाली. यापुढे अशी कारवाई न करण्याची हमी येथील सरकारी पक्षाने ममता बॅनर्जींना दिली का? तसेच विरोधकांना चिरडणाऱ्या “बंगाली हिंसेचे” धडे तर गिरवले जात नाही ना? महाराष्ट्राचे राजशिष्टाचार, पर्यटन मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली?” असे सवाल उपस्थित करत याबाबत अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी”, अशी मागणी शेलार यांनी यावेळी केली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.