.. तर पूर्ण क्षमतेने नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु होणार; उपमुख्यमंत्र्यांचे संकेत

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्यात आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह  सुरु होत आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी पुण्यात बोलताना महत्वाचं भाष्य केलं आहे.

बालगंधर्व रंगमंदिरात नटराज पूजन झाल्यानंतर रंगमंचावर आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी म्हटलं की, दिवाळीनंतर देखील कोरोना रुग्णांची संख्या अशीच कमी होत राहिली तर नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेची परवानगी देण्यात येईल. कलाकारांना कोरोना काळात खूप काही सहन करावं लागलं असल्याचं सांगत कलाकारांच्या मंडळाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असं आश्वासन देखील पवारांनी दिलं.

बालगंधर्व रंगमंदिराच्या नूतनीकरणाबाबत मी महापौर आणि आयुक्तांना सूचना देणार आहे. याबाबत दोन मतप्रवाह आहेत, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, नाट्यगृहाचे नूतनीकरण करताना कलाकारांचा विचार करायला हवा. आधीच दीड वर्षे नाट्यगृहे बंद होती. त्यात नूतनीकरणासाठी पुन्हा बालगंधर्व बंद ठेवावे लागल्यास कलाकार आणखी अडचणीत सापडतील, असं पवार म्हणाले. कोल्हापूर आणि मुंबईतील चित्रपट सृष्टीत नवीन सुविधा देऊ, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, काही लोकांचे प्रयत्न आहेत की बॉलीवूड महाराष्ट्रातून बाहेर घेऊन जायचं. त्यासाठी एका राज्याचे मुख्यमंत्री इथे आले देखील होते. तो त्यांचा अधिकार आहे. पण चित्रपटसृष्टी मुंबईतच राहावी अशी आपल्या सर्वांची अपेक्षा आहे आणि महाविकास आघाडी त्याच दिशेने प्रयत्न करेल, असंही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, कोल्हापूर आणि मुंबई येथील चित्रनगरीत उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. चित्रपट आणि नाट्यगृहांसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येत आहे. 19 महिने नाट्यगृह बंद राहिल्याने कलावंतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. दिवाळीनंतर परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यास नाट्यगृहात 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थिला परवानगी देण्यात येईल.

कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला आहे. एकल कलावंतांना 5 हजार आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील संस्थांना ५० ते ७० हजार रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरील समितीद्वारे एकल कलावंतांची निवड करण्यात येणार आहे. यासंदर्भात अडचणी आल्यास त्या प्राधान्याने सोडविण्यात येतील.

राज्याचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून राज्याचे सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनीही या क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे. सांस्कृतिक चळवळ अधिक गतीने पुढे नेण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. राज्याच्या विकासाचा विचार करताना कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा विचार तेवढाच महत्वाचा आहे. महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी एक कुटुंब म्हणून सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कला क्षेत्रातील व्यक्तींच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक असल्याने त्याबाबत संबंधितांशी चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले.

आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरु होत आहेत. दरम्यान आजपासूनच अम्युझमेंट पार्कही  खुली करण्यात येणार आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने काल शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आजपासून म्हणजेच, 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.