तडजोडीच्या साखळीत लोकप्रतिनिधी अव्वल! भाग १७

0

बुरशीयुक्त प्रकरणी बचावाचा पवित्रा : सदस्यांनी बाळगले मौन

जळगाव, दि. 28 –
जिल्हा परिषदेमधील अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात येणार्‍या शेवयांमध्ये भ्रष्टाचाराची देखील बुरशी लागली असून या साखळीत लोकप्रतिनिधी अव्वल असल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण दडविण्यासाठी काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नांची शिकस्त करीत असताना त्याला विरोध करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य पुढे येत नसल्याचे कटू सत्य समोर आले आहे.
पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील तक्रार जि.प सदस्या रेखा राजपूत यांनी केल्यानंतरही या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई होईल असे स्पष्ट केले होते. मात्र रँडम पद्धतीच्या चौकशी सोपस्कारानंतर हे प्रकरण थंडबस्त्यात पडून आहे. सत्ताधारी भाजपा पदाधिकारी सत्तेचा दुरुपयोग करीत असून ठेकेदार व अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवसेना सदस्य जिल्हा परिषदेच्या छोट्या-छोट्या प्रकरणावरुन रान उठवित असतात मात्र बालकांच्या हिताच्या प्रश्‍नाकडे त्यांनीही रेखा राजपूत यांनी एकाकी पाडल्याचे दिसून येते. शेवयांचा पुरवठा करणारा ठेकेदार हा भाजपाचा पदाधिकारी असल्याने त्याच्या संरक्षणासाठी व कारवाई टाळण्यासाठी अधिकार्‍यांनी कागदीघोडे नाचविण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसने तर या गंभीर विषयावर ब्र शब्द देखील काढला नसल्याने सार्‍यांचीच या प्रकरणी खिचळी शिजत असल्याची चर्चा रंगत आहे. तडजोडीत माहिर असलेल्या काही लोकप्रतिनिधींनी यात पुढाकार घेवून कारवाईला अडथळा निर्माण केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.