खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसे यांनाही ईडीचे चौकशीसाठी समन्स

0

मुंबई, प्रतिनिधी 

पुण्यातील  भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

पुण्यामधील  भोसरी येथील वादग्रस्त भुखंड प्रकरणाची ईडीतर्फे चौकशी सुरू असून यात खडसे यांचे जावई  गिरीश दयाराम चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर कालच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली आहे. आता याच प्रकरणात खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.

मंदाताई खडसे आणि गिरीश चौधरी यांनी संयुक्तरित्या भोसरी येथील भूखंड खरेदी केला होता. गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर खडसे दाम्पत्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे आधीच मानले जात होते. या पार्श्‍वभूमीवर ईडीचे समन्स बजावण्यात आले आहे. यावर मंदाताई खडसे यांनी मुदत मागून घेतली आहे. यामुळे त्यांची लागलीच चौकशी होण्याची शक्यता तशी कमी आहे.

कालच या प्रकरणी एकनाथराव खडसे यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली आहे. त्यांनी ईडीला चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली असून दहा दिवसांत सर्व कागदपत्रे देण्याचे मान्य केले आहे. यानंतर मंदाताई खडसे यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मंदाताई यांना चौकशीसाठी ७ जुलै रोजी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. तथापि, त्यांनी १४ दिवसांची वेळ मागून घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.