एकाचवेळी 50 शिक्षकांच्या चौकशीची ऐतिहासिक घटना!

0

जळगाव येथील ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे आर.आर.विद्यालय गेल्या चार वर्षापासून शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यातील वादामुळे चर्चेच्या फेर्‍यात सापडले आहे. संस्थाचालक आणि शिक्षक यांच्यातील वादाची परिसिमा म्हणजे फेबु्रवारी 2018 मध्ये विद्यालयात झालेल्या दहावीच्या परिक्षेत भूमितीच्या पेपरला सामुहिक कॉपी झाल्याचा संस्थाचालकांचा आरोप होय. दहावीच्या भूमिती पेपरला झालेल्या सामुहिक कॉपी प्रकाराची समितीमार्फत चौकशी केली जाते आहे. ती चौकशी समिती आर.आर.विद्यालयात दाखल झाली असून समितीतर्फे या कॉपी प्रकाराची चौकशी सुुरु आहे. समितीतर्फे होणार्‍या चौकशीला आमचा विरोध नाही. ती चौकशी निःपक्षपातीपणे झाली पाहिजे. कोणाच्याही दबावाखाली ती होता कामा नये, या सामुहिक कॉपी प्रकारामुळे संस्थेच्या 100 वर्षाचा नावलौकीक धुळीस मिळाला म्हणून संस्थाचालक अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या अस्वस्थतेमागचे कारण समजू शकतो. तथापि, संस्थेच्या बदनामीमुळे अस्वस्थ होणारे संस्थाचालक त्यांच्या विरूध्द शाळेच्या मुख्याध्यापकासह 68 शिक्षकांनी बंड पुकारले तेव्हा त्यांची अस्वस्थता कुठे गेली होती. गेल्या चार वर्षात शिक्षक संस्थाचालक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिक्षकांना वेठबिगारी सारखे वागवितांना शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार संस्थाचालकांच्या मनाला का शिवला नाही? त्याच बरोबर 12 फेबु्रवारीला झालेल्या भूमितीच्या पेपरला सामुहिक कॉपीचा गौप्यस्फोट 31 मार्च रोजी म्हणजे तब्बल दिड महिन्यानंतर पत्रकार परिषदेत करण्याचे कारण काय? शाळेत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात सामुहिक कॉपी कैद झाली होती तर त्यांनी लागलीच त्याची तक्रार संबंधितांकडे का केली नाही? तरी सुध्दा त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेवून शिक्षण खात्यांच्यावतीने 50 शिक्षकांची एकाचवेळी चौकशी केली जाण्याचा जळगाव जिल्ह्याच्या इतिहासातील हा पहिलाच प्रकार म्हणता येईल.
ईस्ट खान्देश एज्युकेशन या संस्थेला 100 वर्षांचा इतिहास आहे. आर.आर.विद्यालयातून अनेक महान व्यक्तींनी शिक्षण घेतलेले आहे. त्यात भारताचे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि प्रसिध्द उद्योगपती जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलालजी जैन यांचे नाव प्रामुख्याने घेता येईल या नामावलीमध्ये अनेक नामवंत व्यक्तीचा समावेश आहे. अशा नावाजलेल्या शिक्षण संस्थेच्या संचालकांकडून स्वार्थासाठी शिक्षकांचीच पिळवणूक होत असल्याने त्यासाठी शिक्षक रस्त्यावर उतरून त्यांचे विरूध्द सामुहिक आंदोलन करीत असतील तर संस्थेची ही नामुष्कीच नव्हे काय? गेल्या चार वर्षापासून विद्यालयातील मुख्याध्यापकासह 68 शिक्षकांकडून संस्थाचालकाविरूध्द लढा दिला जातोय. दरम्यान, शाळेतील पिण्याचे पाणी तोडण्याचा हिन प्रकारही संस्थाचालकाकडून झाला. सर्व शिक्षकांनी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक आणि शिक्षण मंत्र्याकडे धाव घेतली त्यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांची बाजू समजून घेवून त्यांना आधार दिला. शिक्षकांनी शेवटी न्यायालयात दाद मागितली आणि न्यायालयानेही शिक्षकांच्या बाजूने कौल दिला. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करणार्‍या शिक्षकांना त्यांच्या शिक्षण दानाच्या कामा ऐवजी त्यांच्या मागे दुसर्‍याच कामाचा ससेमिरा लावण्यात आला. त्यामुळे शिक्षकांची शक्ती भलत्याच कामात खर्च होतेय. आर.आर.विद्यालयात कॉपी झाली नसेल असे ठामपणे दावा आम्ही करत नाही. परंतु एकूण 50 शिक्षक हे कॉपीला प्रोत्साहन देणारे आहेत. म्हणून त्या सर्वांची चौकशी करणे, हा प्रकार मनाला पटणारा नाही. आंब्याच्या अडीतील एखादा आंबा नासका निघाला म्हणून सर्वच आंबे नासके आहेत असे म्हणणायचा हा प्रकार आहे. एखादा शिक्षक दोषी असू शकतो. ते आम्ही समजू ही शकतो. परंतु सर्व 50 शिक्षक दोषी आहेत म्हणून त्यांची चौकशी करणे हे कितपत योग्य आहे. अशाप्रकारे शिक्षकांच्या होणार्‍या चौकशीमुळे शाळेची बदनामी होतेय. त्यामुळे या शाळेत विद्यार्थी प्रवेश घेण्यास धजावतील का? याप्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर शिक्षण संस्थाचालकांना ही शाळाच बंद करायची तर नाही ना? असाही प्रश्‍न उपस्थित केला जाईल. शिक्षण संस्थाचालकांच्या व्यापारीकरणाला शाळेतील शिक्षक साथ देत नसल्याने संस्थाचालक शिक्षकांच्या बाबतीत ही टोकाची भूमिका घेत असल्याचा आरोप आहे आणि त्यात तथ्याअंश असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत शाळेतील विद्यार्थी व पालक या सर्व शिक्षकांच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे. शिक्षकांप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार का केला जात नाही? कोवळ्या मनावर संस्थेचे संस्थाचालक आणि शिक्षक यांच्यात जे चालले आहे त्याचा परिणाम कसा होत असेल, याची पालकांच्या भूमिकेत जावून संस्थाचालकांने विचार केला तर त्यातील खरा प्रकार त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. संस्थाचालक आणि शिक्षकांच्या भांडणात विद्यार्थ्यांना का वेठीस धरले जात आहे. त्यांचा बळी घेण्याचे कारण काय? दहावीच्या परिक्षेचा निकाल तोंडावर आला असतांना या चौकशी नाट्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होत असेल याचाही विचार होणे आवश्यक आहे. कॉपी प्रकाराची जरूर चौकशी व्हावी पण ती निःपक्षपातीपणे व्हावी हीच अपेक्षा…

Leave A Reply

Your email address will not be published.