इंदोरीकर महाराज पुन्हा नव्या वादात; तृप्ती देसाईंची सरकारकडे महत्त्वाची मागणी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी ‘ज्यांनी गळ्यातील माळा काढल्या त्यांच्यासाठी कोरोनाची तसरी लाट आहे,’ असे वक्तव्य एका कीर्तनादरम्यान केले.

त्यांच्या याच वक्तव्यावर भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी इंदोरीकर महाराजांना नेहमी पाठीशी का घातले जाते असा सवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना उद्देशून केला आहे. तसेच त्यांनी इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. यापूर्वी इंदोरीकर महाराज यांनी लिंगभेदाबाबत वक्तव्य केले होते. त्यावेळी देसाई यांनी इंदोरीकर महाराजांना नोटीस पाठवत स्पष्टीकरण न दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.

“आरोग्यमंत्री राजेश टोपे तुम्ही डॉक्टर आहात. तुम्ही इंदोरीकर महाराजांना दरवेळी पाठीशी का घालताय ? आपल्या राज्यात सर्वांना समान न्याय आणि समान कायदा नाही का. इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा,” असे तृप्ती देसाई म्हणाल्या. तृप्ती देसाई यांच्या मागणीनंतर आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. देसाई यांनी राजेश टोपे यांच्यावरदेखील टीका केली आहे. त्यांनी इंदोरीकर महाराज यांना नेहमी पाठीशी का घातलं जातं, असा सवाल केला आहे.

काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज

“कोरोनाचा प्रकोप जगभरात पाहायला मिळतोय. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येवून गेल्या. यात अनेकांना आपल्या प्राणास मुकावं लागलं. आता आपण सर्वचजण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत. आता तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच आहे,” असे इंदोरीकर महाराज म्हणाले. तसेच “कीर्तनात उत्साहानं बसायला हवं. कोरोना पॉझिटिव्ह असल्यासारखं वागू नये. दोन लाटांतही आपण जिवंत आहोत, हे आपलं भाग्य आहे. हा आपला जन्म नसून पूनर्जन्म आहे,” असेदेखील इंदोरीकर महाराज म्हणाले.

अनिसंचाही आक्षेप

दरम्यान, इंदोरीकर महाराजांनी केलेल्या कोरोना वक्तव्याबाबत अंनिसचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना होऊ नये यासाठी शासन वेगवेगळ्या स्तरावर काम करत असताना लस घेणे काळाची गरज बनले असताना याविषयी गैरसमज पसरवले जात आहेत, तेही वारकरी संप्रदायाच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा कोरोनाच्या काळात अशा पद्धतीची विधान करणे चुकीचे असून याबाबत जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत जरी गुन्हा नोंद होत नसला तरी मात्र साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यानुसार यावर कारवाई होते का हे पाहणे गरजेचे आहे, असा आक्षेप अंनिसचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी नोंदवला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.