आयटीटीएफ वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिप; सायलीची भारतीय संघात निवड

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

पोर्तुगाल येथे २ ते ८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आयटीटीएफ वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिपसाठी १५ वर्षांखालील मुलींच्या गटात सहभागी होणाऱ्या भारतीय संघाची घोषणा टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने केली. त्यात नाशिकच्या सायली वाणी हिचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय टेबल टेनिस संघाचे यापूर्वीही तिने प्रतिनिधित्व केले आहे. स्पर्धेपूर्वी ‘ साई’च्या मान्यतेने या संघातील खेळाडूंचे सराव शिबिर २० ते २९ नोहेंबर या काळात दिल्लीत होणार आहे. तेथूनच भारतीय संघ पोर्तुगालला रवाना होईल. या संघात नाशिकच्या सायली वाणीबरोबर पुण्याची पृथा वर्टीकर, हरियानाची सुहाना सैनी व दिल्लीच्या कासवी गुप्ता यांचा समावेश भारतीय संघात आहे. स्पर्धेत भारताबरोबर जपान, जर्मनी, उक्रेन, रशिया, मॉरिशस, अमेरिका, पोर्तुगाल या देशांचे संघ सहभागी होतील.

सायलीने जानेवारी २०२१ मध्ये इंदूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटाचे राष्ट्रीय अजिंक्यपद मिळविले होते. यावर्षी तिने ट्युनिशिया, ओमान, हंगेरी व स्लोवाकिया येथे झालेल्या डब्लूटीटी यूथ कन्डेंडर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या शुभ हस्ते सायलीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी सायलीला शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू तनिषा कोटेचा व प्रशिक्षक जय मोडक यांचाही सत्कार झाला.

याप्रसंगी नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, संजय मराठे आदी उपस्थित होते. याबद्दल हंगामी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, राज्य टेबल टेनिस संघटनेचे संजय कडू, प्रकाश जसानी, रामलू पारे, विवेक आळवणी, राकेश पाटील व संतोष पवार आदींनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.